वीज बिल भरणा केंद्र बंद झाल्याने संताप
By admin | Published: April 24, 2017 02:36 AM2017-04-24T02:36:32+5:302017-04-24T02:36:32+5:30
खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध
पनवेल : खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी खारघरमधील महावितरणचे सिडको विभागीय कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. महावितरणच्या निर्णयाविरोधात खारघर शहर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरात जास्तीतजास्त वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी मनसे करीत असताना त्याची दखल न घेता नागरिकांना सोयीस्कर असलेले वीज बिल भरणा केंद्र महावितरण बंद करीत असेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रि या मनसे शहर उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी दिली. खारघर शहरातील सेक्टर ४ मधील सिडको विभागीय कार्यालयात महावितरणचे हे वीज बिल भरणा केंद्र अचानकपणे बंद करण्यात आले असून याबाबत कोणतीही सूचना अथवा कारण रहिवाशांना देण्यात आले नाही. खारघर सेक्टर ८ मधील रहिवासी अशोक मिरकुटे हे बुधवारी याठिकाणी वीज भरण्यासाठी गेले असता हे केंद्र बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना सेक्टर १२ याठिकाणी वीज बिल भरण्यासाठी जावे लागणार असल्याने असंख्य नागरिकांना त्रास होणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)