आयुक्तांच्या निषेधाचा ठराव
By admin | Published: February 16, 2017 02:20 AM2017-02-16T02:20:40+5:302017-02-16T02:20:40+5:30
महापौरांप्रती केलेला शब्दप्रयोग चुकीचा असल्याच्या कारणावरून बुधवारी महासभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात
नवी मुंबई : महापौरांप्रती केलेला शब्दप्रयोग चुकीचा असल्याच्या कारणावरून बुधवारी महासभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. या वेळी अधिकार नसतानाही आयुक्त ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
पालिका आयुक्त व महापौर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. यादवनगर येथील ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमावेळी बदली केलेल्या त्या मुख्याध्यापकाची नियुक्ती महापौर सुधाकर सोनावणे हे शिक्षण मंडळ सभापती असताना झालेली असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते; परंतु त्या मुख्याध्यापकाची नियुक्ती आपल्या कार्यकाळातली नसल्याने आयुक्तांकडून आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. बुधवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते जे. डी. सुतार यांनी यावर चर्चा घडवून आणली. आयुक्तांनी महापौरांवर चिखलफेक केली असल्याचे सांगत त्यांनी निषेध नोंदवला. या वेळी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना महापौरांचा उल्लेख करताना केलेला शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. तर संविधानिक पद भूषवताना त्यांनी राज्यघटनेचाही आदर करावा, असा सल्ला दिला. शिवाय हिंमत असेल तर आयुक्तांनी मीच महापालिका चालवतो, असे शासनाला कळवावे, आवश्यकता असल्यास लोकप्रतिनिधी राजीमानाही देतील, असाही टोला मारला; परंतु ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवण्याचा आयुक्तांना अधिकारच नसल्याचे नगरसेवक संजू वाडे यांनी सभागृहात सांगितले. हा उपक्रम राबवायला सुरुवात झाली, तेव्हाच विरोध करण्याची आवश्यकता होती; परंतु यापुढे तरी त्यांना प्रभागात पाय ठेवू देऊ नये, असा सल्ला त्यांनी नगरसेवकांना दिला. (प्रतिनिधी)