वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष संवर्धनाचा संकल्प; पालिका कर्मचाऱ्यांचीही वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:38 AM2019-06-17T01:38:32+5:302019-06-17T01:39:02+5:30
तीन दिवसांमध्ये ५७५ टन फणस विक्री
नवी मुंबई : वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प शहरातील अनेक महिलांनी जाहीर केला. महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी ५० रोपांची लागवड केली आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. बाजार समितीमध्ये तीन दिवसांमध्ये तब्बल ५७५ टन फणसाची विक्री झाली आहे.
प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती सुरू केली आहे. महापालिका प्रशासनानेही या वर्षी वृक्षारोपणाचे आवाहन केले होते. सुरुवात म्हणून शनिवारी महापालिका मुख्यालयामधील कर्मचाºयांनी इमारतीच्या परिसरामध्ये ५० चाफ्याचे वृक्ष लावले आहेत. या वेळी सचिव चित्रा बावीस्कर यांच्यासह १०० पेक्षा जास्त महिला कर्मचारी उपस्थित होत्या. नागरिकांना वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून देताना पालिकेच्या कर्मचाºयांनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. सीबीडी, नेरुळ व इतर परिसरामध्येही रविवारी अनेक महिलांनी वृक्षारोपण करून वटपौर्णिमेचा सण साजरा केला. या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून सण साजरा करण्यात आला.
वटपौर्णिमेदिवशी फळांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. बाजार समितीमध्ये कोकण, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडूमधून मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. तीन दिवसांत तब्बल ५७५ टन फणसाची विक्री झाली आहे.