कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:18 PM2020-09-11T23:18:13+5:302020-09-11T23:18:22+5:30
नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
कळंबोली : तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
पनवेलपासून जवळ तळोजा एमआयडीसी आहे. ही औद्योगिक वसाहत ९०७ हेक्टरवर विस्तारित झाली आहे. या परिसरात ९०० कारखाने आहेत. यात ४०० कारखाने रासायनिक आहेत. या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी एमआयडीसीजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीत सोडण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे नदी दूषित होत आहे.
कोरोनाच्या काळात कारखाने बंद असल्यामुळे पनवेल परिसरातील नद्या स्वच्छ झाल्या होत्या, परंतु अनलॉकमध्ये कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. स्वच्छ झालेली कासाडी नदी पुन्हा प्रदूषित होऊ लागली आहे. यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे परिसरातील रहिवाशांना कासाडी नदीतील दुर्गंधीमुळे श्वसनाचे त्रास सहन करावे लागत आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येते, पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यानुसार, एमआयडीसीतील कारखानदारांना १५ कोटींचा दंड ठोठावला. ती रक्कम वसूलही करण्यात आली. कित्येक वेळा कारखानदारांची पाणीकपातही करण्यात आली होती. तरीदेखील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नदी संवर्धन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे तळोजा कारखानदारांनी दंडात्मक १५ कोटींची रक्कम जमा केली आहे. या रकमेतून कासाडी नदीचे संवर्धन करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल; त्याचबरोबर खाडीकिनारी खारफुटीचेही नुकसान होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.