शासनाच्या आंबा महोत्सवाला उलवे येथे प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:34 PM2019-05-18T16:34:20+5:302019-05-18T16:34:49+5:30
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोंकण आंबा महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.
पनवेल - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोंकण आंबा महोत्सवाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . दि. १६ ते २२ मे दरम्यान उलवे नोड येथे सेक्टर १९ मधील भूमिपुत्र भावनासमोरील मैदानात हा कोंकण आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे . रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील उच्च प्रतीची आंबा या महोत्सवात ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेला आहे.
अमादार बाळाराम पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन पार पडले . सध्याच्या घडीला नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या विक्री जागोजागी केली जाते . यापैकी अनेक आंबा विक्रेते हे परप्रांतीय असताना . कोंकणातील आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबे तसेच कार्बाइड मिश्रित आंब्यांची विक्री त्यांच्यामार्फत केली जाते . हे आंबे आरोग्याला घातक असतात . या आंब्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा देखील समावेश असल्याने चढ्या भावात आंब्याची विक्री केली जाते . अशा परिस्थितीत शेतक-यांनी पिकविलेला उच्च प्रतीचा आंबा थेट ग्राहकांना मिळावा या हेतूने उलवा नोड याठिकाणी हा महोत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत भरविण्यात आलेला आहे. कोंकणातील शेतक-यांना याठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तीन दिवसात हजारोंच्या संख्येने ग्राहकांनी या महोत्सवाला भेट दिली आहे . २० ते २५ स्टोल्स च्या माध्यमातून विविध शेतकरी याठिकाणी आंब्याची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे शहरी भागात अस्सल कोंकणचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने याठिकाणी धाव घेत आहेत. या महोत्सवात पुढील दिवसातील कोंकणातील फणस, आंबे करवंदे देखील ग्राहक वार्गाला उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी दिली. पनवेल सहा नवी मुंबईमधील नागरिकांनी या आंबा महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजक पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी केले आहे.