पनवेल : माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यावर १७ फेब्रुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेकापचे सरचिटणीस प्रितम म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नितीन पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पनवेल पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे. या प्रकाराबद्दल आमदार प्रशांत ठाकू र यांनी १८ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जर का आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्हीही या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितले. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकाही कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने शेकाप-भाजपामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर झालेल्या या वादामुळे हा प्रकार घडला. या घटनेसंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शेकाप शहर चिटणीस माजी नगरसेवक प्रितम म्हात्रे, सचिन म्हात्रे, अरुण म्हात्रे, विजय म्हात्रे व इतर मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मारेक ऱ्यांनी मला मारण्यासाठी हातात कोयते, हॉकी स्ट्रिक आणली होती,असे नितीन पाटील यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. भिवंडी सारख्या घटनेची पुनरावृत्ती पनवेलमध्ये होऊ नये म्हणून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा या घटनेचे जशास तसे उत्तर आम्ही देऊ, असा इशाराच त्यांनी दिला आहे. या वेळी पत्रकार परिषदेत भाजपा शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा नेते परेश ठाकू र, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, सी. भगत, नीलेश पाटील, विश्वास पाटील, प्रदीप सावंत आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ
By admin | Published: February 19, 2017 3:49 AM