प्रतिसादात नवी मुंबईकर देशात सर्वोत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:38 PM2019-03-06T23:38:54+5:302019-03-06T23:39:12+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये यावर्षीही नवी मुंबईने ठसा उमटवला आहे.
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये यावर्षीही नवी मुंबईने ठसा उमटवला आहे. नागरिकांच्या प्रतिसादामध्ये देशातील सर्वोत्तम शहर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतवर्षी स्वच्छ शहरामधील नवव्या क्रमांकावरून या वर्षी सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुन्हा एकदा गौरव मिळविला असून, टॉप टेन अमृत शहरांमध्येही नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईने स्वच्छतेमध्येही नावलौकिक मिळवला आहे. यापूर्वी राज्य शासनाने घेतलेल्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा नवी मुंबईने यश मिळविले होते. केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केल्यानंतर त्यामध्येही महापालिकेने सहभागी होण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपासून सातत्याने स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. देशातील सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा नवी मुंबईने उभारली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाणही वाढविले आहे. झोपडपट्टीमध्येही मलनि:सारण वाहिन्या टाकणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. शहरातील कचराकुंड्यांची संख्याही कमी केली आहे. हागणदारीमुक्त शहर यापूर्वीच घोषित झाले असून, जास्तीत जास्त प्रसाधनगृहांची उभारणी व त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियान काळात शहरातील भिंती रंगविण्यात आल्या. पडीक जागांची साफसफाई करून त्यांचे सुशोभीकरण केले. स्वच्छतेसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल १६ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये स्वच्छतेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती; परंतु नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले होते. पथनाट्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सोसायटी, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्ससाठीही स्पर्धा ठेवण्यात आली. शहरात पथनाट्य, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या सर्वांमुळे नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला. नागरिकांच्या प्रतिसादासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल यांच्या हस्ते उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, अमरिश पटनिगिरे, दादासाहेब चाबूकस्वार उपस्थित होते. अधिक वृत्त /४
>अशा घेतल्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनमार्फत सुरू केलेल्या स्वच्छता अॅपवरील नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली. केंद्रामधून नागरिकांना थेट फोन करून त्यांना स्वच्छतेविषयी विचारणा केली जात होती. १९६९ या टोल फ्री क्रमांकावरही नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
>या गोष्टींसाठी पालिकेचा गौरव
स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांच्या प्रतिसादामध्ये देशातील सर्वोत्तम शहर म्हणून निवड
देशातील स्वच्छ शहरांमध्ये सातवा क्रमांक
स्वच्छ शहरामध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर
केंद्रीय निरीक्षण पथकाने कागदपत्र व प्रत्यक्ष तपासणीमध्ये थ्री स्टार रेटिंग दिले
हागणदारीमुक्त शहरांमध्ये ओडीएफ डबल प्लस रेटिंग प्राप्त
अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये असलेले राज्यातील एकमेव शहर
>अभियानातील कामगिरी
देशातील सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात यश
देशातील अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड असलेले शहर
ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण वाढविण्यात यश
झोपडपट्टी परिसरामध्येही मलनि:सारण वाहिन्या टाकण्यास सुरुवात
अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांची उभारणी व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर
प्रसाधनगृहांची उभारणी व देखभालीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यश
शहरातील सर्व भिंती, चौकांची रंगरंगोटी व सुशोभीकरण
उद्याने, शाळा व मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खतनिर्मिती प्रकल्प
>केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केल्यापासून प्रत्येक वर्षी महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा आलेख उंचावत आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभाग नोंदविला हे महत्त्वाचे. स्वच्छतेची चळवळ उभी करण्यात यश मिळविले आहे. सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळे नवी मुंबईचे नाव देशपातळीवर उंचविण्यात यश आले असून, स्वच्छतेचा हा आलेख असाच वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- विजय चौगुले,
विरोधी पक्ष नेते
>स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईमधील नागरिकांनी चांगला सहभाग दर्शविला. शहराविषयी प्रेम व्यक्त केलेच शिवाय अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला, यामुळेच राज्यातील पहिल्या क्रमांकाचे व देशातील सातव्या क्रमांकाचे यश मिळाले आहे. हा पुरस्कार सर्व शहरवासीयांच्या मेहनतीमुळे मिळाला आहे.
- मंदाकिनी म्हात्रे,
उपमहापौर, नवी मुंबई