सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात केलेल्या कारवाईत गोठीवलीतील इमारतीवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:41 AM2017-11-23T02:41:22+5:302017-11-23T02:41:36+5:30
नवी मुंबई : सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.
नवी मुंबई : सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी कोपरखैरणेत संयुक्त मोहीम राबविल्यानंतर बुधवारी गोठीवली गावातील एका चार मजली बेकायदा इमारतीवर हातोडा मारण्यात आला. विशेष म्हणजे, याअगोदरही या इमारतीवर अंशत: कारवाई करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा कारवाई करूनही ती जमीनदोस्त करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस. एस. पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. गोठीवली सेक्टर ३०-डीमध्ये ही इमारत उभारण्यात आली होती. संबंधित बांधकामधारकाला रीतसर नोटीसही बजावण्यात आली होती; परंतु संबंधिताकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुधवारी या इमारतीवर बुलडोझर फिरविण्यात आला. अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नियंत्रक गणेश झिने, सहायक कार्यकारी अभियंता सतीश काटकर व विकास खडसे आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अनधिकृत इमारतीत घरे विकत घेऊ नयेत, असे आवाहन पी. बी. राजपूत यांनी केले आहे.