नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या चार सत्रांचे नियोजन करण्यात आले असून, यामधील पहिली मोहीम डिसेंबर २०१९ मध्ये राबविण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात, असे आढळून आले आहे. यामुळे मोहिमेमध्ये लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महापालिकेचे ध्येय आहे.
या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स सभा घेण्यात आली होती. या सभेत विविध सदस्यांचे प्रतिनिधी, रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेचा पहिला टप्पा २ ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत राबविण्यात आला असून, यामध्ये एकूण ६८ सत्रांद्वारे १३९ गरोदर माता व ५८२ बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
सदर मोहिमेमध्ये एकूण १४६ गरोदर मातांना व ६०३ बालकांना लसीकरण करण्यात आले असून या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद आहे. शहरात नियमित लसीकरणांतर्गत बीसीजी, बी ओपीव्ही, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलंट, एफ आयपीव्ही, रोटा, गोवर रु बेला, टीडी, डीपीटी या लसी मोफत देण्यात येत असून, प्रत्येक इंजेक्शनकरिता नवीन सीरिंज व सुई वापरण्यात येते. तरी सर्व नागरिकांनी पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना लसीकरण करून संरक्षित करावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.