नवी मुंबई : पालिका कार्यक्षेत्रामध्ये दीड दिवसांच्या ९८७१ गणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका सुरू होत्या. महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना ही प्रतिसाद मिळत असून, दिवसभरात २६३५ मूर्तींना या तलावांमध्ये निरोप देण्यात आला.
नवी मुंबईमध्येगणेशोत्सव शांततेमध्ये व सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. २२ नैसर्गिक तलावांसह १४१ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मुख्य विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले. तराफांची सोय केली आहे. पट्टीचे पोहणारे, अग्निशमन दलाचे जवान, वैद्यकीय पथकेही उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांना सूचना देण्यासाठी स्टेज, माईक व इतर सुविधाही दिल्या आहेत. गेल्या वर्षी ९०७७ घरांमध्ये दीड दिवसाच्या गणरायांची प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी घरगुती व सार्वजनिक मिळून ९८७१ ठिकाणी बाप्पांचे आगमन झाले होते. बुधवारी सायंकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका सुरू करण्यात आल्या. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मुख्य तलावांमध्ये विसर्जन सुरू होते.
महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वत: सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ एकचे उपायुक्त साेमनाथ पोटरे, परिमंडळ दोनचे श्रीराम पवार यांनीही विसर्जन स्थळांना भेटी देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. मुख्य विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था केली होती. विद्युत व्यवस्था, जनरेटरसह इतर सुविधाही पुरविली आहे.
चौकट१० टन ९४५ किलो निर्माल्यमहानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळावर निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये १० टन ९४५ किलो निर्माल्य संकलित झाले आहे. हे निर्माल्य महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी नेण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलनाचे काम सुरू आहे.
चौकटविभागनिहाय गणेश विसर्जनाचा तपशीलविभाग - मुख्य तलाव - कृत्रिम तलावबेलापूर - १९६४ - ३४८नेरूळ - १००९ - ३६५तुर्भे - ४०४ - ४५७कोपरखैरणे - ९१३ - ३८३घणसोली १२१६ - २४४ऐरोली - ८६१ - ४०९दिघा - २११ - ८७