नवी मुंबई : दिवाळी सणाचा आनंद आदिवासी पाड्यातील आणि वृद्धाश्रमातील नागरिकांनादेखील घेता यावा, यासाठी शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘एक करंजी लाखमोलाची’ हा सामाजिक उपक्र म ८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आला. या निमित्ताने विविध भागांतून जमा केलेला दिवाळीचा फराळ, फळे आणि नवीन कपड्यांचे वाटप आदिवासी आणि वृद्धाश्रमातील नागरिकांमध्ये करण्यात आले.
दिवाळी म्हटली की सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. नवनवीन वस्तूंची खरेदी, मजा मस्ती, फटाक्यांची आतशबाजी आदी उत्साहाचे वातावरण पसरलेले असते; परंतु ज्या नागरिकांना असे सण साजरे करता येत नाहीत, अशा आदिवासी पाड्यातील नागरिकांसाठी शिवआधार चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने २०१४ सालापासून ‘एक करंजी लाखमोलाची’ हा उपक्र म राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्र माच्या माध्यमातून वंचितांना दिवाळी सणाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमासाठी संस्थेने जुईनगरमधील आनंदवन, तिरंगा, सप्तशृंगी सोसायटी तसेच इतर भागातून दिवाळी फराळ, फळे गोळा करून आदिवासी पाड्यांवर त्यांचे वाटप केले. त्यानंतर गोळा केलेल्या फराळाचे रायगड जिल्ह्यातील कोंडप आदिवासी पाड्यावर गुरु वारी वाटप केले. तसेच आदिवासी पाड्यातील वंचित घटकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाचा दीप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्र माच्या निमित्ताने आदिवासी पाड्यावरील घरांसमोर रांगोळी काढून पणत्या पेटवण्यात आल्या. पाड्यावरील लहान मुले व महिलांना नवीन कपडे, साड्यांचे वाटपही करण्यात आले. दिवाळी फराळाचे देखील सर्वांना वाटप करण्यात आले. तसेच पनवेल येथील करुणेश्वर वृद्धाश्रम आणि नेरे येथील शांतिवन या ठिकाणी असलेल्या कुष्ठरोगी नागरिकांना फराळवाटप करून हा उपक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्र माला संस्थेचे अध्यक्ष गणेश शेळके, रवींद्र जाधव, अजित शेळके, जालिंदर यमगर, मनोज आयची, अनिकेत वाघोदे इतर सदस्य आणि शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.