नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेल्या दहा गावांमधील ग्रामस्थांचे सिडकोने पुष्पकनगरमध्ये पुनर्वसन केले आहे. या परिसरातील चार भूखंडांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका भूखंडाला प्रतिचौरस मीटरसाठी तब्बल ७६ हजार २२१ रुपये दर प्राप्त झाला असून चार भूखंडांच्या विक्रीतून १०१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.विमानतळापासून जवळच सिडकोने पुष्पकनगरची निर्मिती केली आहे. विमानतळामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना येथे भूखंड दिले आहेत. या परिसराचा विकास करण्यास सिडकोकडून सुरुवात केली आहे. येथील सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक २, १९, २१ व ३९ हे भूखंड सिडकोने विक्री करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. ३२९० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडांच्या विकासासाठी दोन चटईक्षेत्र मंजूर आहे. या भूखंडांच्या विक्रीसाठी ५५ हजार २१६ एवढा आधारभूत दर निश्चित करण्यात आला होता. २७ सप्टेंबरला निविदा उघडण्यात आल्या आहेत. भूखंड क्रमांक ३९ साठी ७६ हजार २२१ रुपये प्रतिचौरस मीटर एवढा दर प्राप्त झाला आहे. चारही भूखंडांच्या विक्रीतून तब्बल १०१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
सिडकोच्या पुष्पकनगरमधील भूखंडाला मिळाला विक्रमी प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 3:04 AM