राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची - गणेश नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 06:32 AM2018-01-28T06:32:50+5:302018-01-28T06:34:13+5:30
घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणारी चित्रभारती चित्रकला स्पर्धा आता एक ब्रॅण्ड बनला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचे विचार रुजविले जात आहेत.
नवी मुंबई - घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणारी चित्रभारती चित्रकला स्पर्धा आता एक ब्रॅण्ड बनला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचे विचार रुजविले जात आहेत. मागील १२ वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. भविष्यात महाविद्यालयीत स्तरावर या स्पर्धा घेण्याची योजना आहे. असे असले तरी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन लोकनेते गणेश नाईक यांनी केले.
जीवनधारा आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रभारती चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २५ जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख प्रमुख आतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ‘लोकमत’चे सह उपाध्यक्ष विजय शुक्ला, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, माजी महापौर सागर नाईक, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार आदी उपस्थित होते.
सध्या देशातील सामाजिक वातावरणात काहीसा नकारात्मक बदल होताना दिसत आहे. राष्ट्राच्या एकसंघतेला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. एकसंघ राष्ट्र हा आपल्या राज्यघटनेचा पाय आहे. हा पाया अभेद्य राहण्यासाठी बंधुभाव जोपासला गेला पाहिजे. जात, धर्म, प्रांत व भाषा या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविणे, हाच चित्रभारती चित्रकला स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. मागील १२ वर्षांतील या उपक्रमाच्या यशाचा उंचावणारा आलेख पाहता आता त्याचा महाविद्यलयीन स्तरावरसुद्धा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच पुढील वर्षापासून ही स्पर्धात महाविद्यालयीन स्तरावरही घेतली जाईल, अशी घोषणा नाईक यांनी या वेळी आपल्या भाषणातून केले. ‘लोकमत’ हे देशातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ठरले आहे. चित्रभारती चित्रकला स्पर्धेच्या आयोजनात ‘लोकमत’चा बरोबरीचा सहभाग राहिला आहे. यापुढेसुद्धा ही परंपरा कायम राहील, असा विश्वास नाईक यांनी या वेळी व्यक्त केला.
चित्रभारती स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील १२० शाळांतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शहराच्या दृष्टीने ही अत्यंत गौरवशाली बाब असल्याचे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी केले. चित्रभारती चित्रकला स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ. संजीव नाईक यांनी प्रास्ताविकातून गेल्या १२ वर्षांतील या उपक्रमाचा आढावा घेतला. प्रत्येक वर्षात स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद हे या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक गावडे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक राजू शिंदे, रवींद्र इथापे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.
स्पर्धेतील विजेते
या मोहिमेत तरुणाईला सहभागी करुन घेण्यासाठी पुढील वर्षापासून कॉलेज
स्तरावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
अ गट
(इयत्ता ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक : साहिल जाधव (पुणे विद्याभवन स्कूल, नेरूळ)
द्वितीय क्रमांक : धिरेंद्र ठाकूर (सेंट आॅगस्टीन, नेरूळ)
तृतीय क्रमांक : रविन सराफ (फादर अॅग्नेल, वाशी)
उत्तजनार्थ : शेख आर.ए. गफार (अंजूमन स्कूल, तुर्भे), जिन्मय एस. आम्ब्रे (भारती विद्यापीठ, बेलापूर), गौरव जाधव (भारती विद्यापीठ, बेलापूर, मिलत एस. नाईकवाडी (एम.जी.एम.स्कूल, नेरूळ) आणि सुमित जे. सापने (चार्टेरेड इंग्लिश स्कूल, ऐरोली)
ब गट
(इयत्ता ८ वी ते १0 वी)
प्रथम क्रमांक : विक्रांत धनावडे (आर.एफ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे)
द्वितीय क्रमांक : अपर्णा कुंभार (श्रीराम स्कूल, ऐरोली)
तृतीय क्रमांक : बाबू आर. आरेथीया (एस.एस.हायस्कूल, नेरूळ)
उत्तजनार्थ : ओमकार आहिरे (सेंट मेरी स्कूल, वाशी), झैनाब शेख (मॉडर्न स्कूल, वाशी), भक्ती कदम (शिरवणे विद्यालय), अनिकेत सावे (ज्ञानपुष्प विद्या निकेतन, सीबीडी)
विविध रंग एकात्मता के संग सांस्कृतिक कार्यक्रम
चित्रभारती चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यानिमित, ‘विविध रंग एकात्मता के संग’ या सांस्कृतिक मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील १२ शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्यांचे सादरीकरण केले. लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
स्पर्धेत १२0 शाळांतील तब्बल २0 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे सतीश माने आणि कला शिक्षक नरेश लोहार यांनी परीक्षण केले.