स्कूलव्हॅन चालकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी; गिरीश गुणे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:20 AM2020-02-03T00:20:28+5:302020-02-03T00:20:41+5:30
विद्यार्थीवाहक संस्था आणि आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कार्यक्रम
कळंबोली : पनवेल विद्यार्थीवाहक संस्थेतील ४५० स्कूलव्हॅन चालकांच्या माध्यमातून १६ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यांच्या सानिध्यात विद्यार्थी किमान एक - दीड तास असतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी व्हॅनचालकांवर असल्याचे मत डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केले. रविवारी विद्यार्थीवाहक संस्था आणि पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२० निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेलमधील गोखले सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, हरेश बेतावडे, अॅड. शुभांगी झेमसे, ज्योती देशमाने, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, लक्ष्मी आय क्लिनिकचे सचिन भूमकर, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका रुचिता लोंढे, सचिन पोलादे, अनिल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला रक्तदान, आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्कूलव्हॅनच्या परिवहन आणि वाहतूक विभागाकडून विविध चाचण्या केल्या जातात. त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओकडून दिले जाते. मात्र, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहकांची मानसिकता कधी तपासली जाते का? असा प्रश्न गुणे यांनी उपस्थित केला. स्कूलव्हॅन चालकांच्या मानसिकतेवर उद्याचे चांगले नागरिक घडू शकतात. त्यामुळे आगामी काळामध्ये विद्यार्थीवाहक संस्थेकडून याकरिता विशेष व्याख्यान आयोजित करण्याचा सल्ला या वेळी डॉ. गिरीश गुणे यांनी दिला.
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी, विद्यार्थीवाहकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल रिक्षा विद्यार्थीवाहक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी केले.विद्यार्थीवाहक संस्था आणि पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात उपक्रमांना मार्गदर्शन करताना मान्यवर.