सर्वसामान्यांवर निर्बंध, दलालांसाठी मात्र पायघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:52 PM2021-04-26T23:52:31+5:302021-04-26T23:52:35+5:30
सिडकोतील प्रकार : नियमांच्या अंमलबजावणीत दुजाभाव
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश देणे बंद केले आहे; परंतु त्याचवेळी विकासक आणि त्यांचे दलाल बिनदिक्कतपणे सिडको भवनमध्ये ये-जा करीत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: रायगड भवनमधील पणन विभागात रात्री उशिरापर्यंत या मंडळींचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोरोना नियमांच्या अंमलबजावणीत सिडको दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही मर्यादीत करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार सिडकोनेही या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू केले आहे. त्याअनुषंगाने ५ एप्रिलपासून सर्वसामान्य नागरिकांना सिडको भवनमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांची कामे रखडू नयेत, त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यादृष्टीने सिडकोने ई व्हिजिटर्स प्रणाली विकसित केली आहे. या प्राणालीबाबत सिडकोच्या संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित विभागप्रमुखांना भेटण्यासाठी इतर व्हर्च्युअल प्रणालीचाही अवलंब करता आला आहे. हा नियम सर्व घटकांना लागू आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. असे असले तरी शहरातील काही बडे विकासक, त्यांचे प्रतिनिधी आणि काही दलाल मंडळी राजरोसपणे सिडकोत ये-जा करीत असल्याचे दिसून आले आहे. सर्वसामान्यांवर निर्बंध आणि दलालांसाठी पायघड्या, असाच काहीसा हा प्रकार असल्याची कुजबुज सिडको वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सिडकोच्या या भूमिकेमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.