एपीएमसीतील व्यापारावर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:14 AM2020-04-29T05:14:49+5:302020-04-29T05:14:56+5:30
एपीएमसीमधील व्यापारावर नवी मुंबई महापालिका निर्बंध घालणार आहे. मंगळवारी उशीरापर्यंत याविषयी बैठका सुरू होत्या.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे तीन नवीन रुगण आढळले आहेत. यामुळे एपीएमसीमधील व्यापारावर नवी मुंबई महापालिका निर्बंध घालणार आहे. मंगळवारी उशीरापर्यंत याविषयी बैठका सुरू होत्या.
एपीएमसीमध्ये आतापर्यंत पाच रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसात तिघांना लागण झाली असून यात दोन व्यापारी व सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने फळ मार्केटमधील उपसचिव व काही कामगारांना होम कॉरंटाईन केले आहे. आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी एपीएमसी पोलीसांना पत्र देवून मार्केटमध्ये वाहनांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. यामुळे मार्केट बंद राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. एपीएमसीमधील कामगार, सुरक्षा रक्षक व काही व्यापाऱ्यांनीही मार्केट बंद ठेवावे, असे मत व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने १४ दिवस मार्केट बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याबद्दल मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सर्व मार्केट बंद केली जाणार नाहीत. मार्केटचे झोन कमी केले जाणार असून याविषयी निर्णय घेण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले.
>अधिकृत सूचना नाही
महापालिका आरोग्य विभागाने पोलीस व तुर्भे विभाग कार्यालयास पत्र देऊन एपीएमसी मार्केट १४ दिवस बंद करण्याचे पत्र दिले आहे. आयुक्तांनी सर्व मार्केट बंद केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी यापैकी कोणतीच लेखी सूचना मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत एपीएमसी प्रशासनास दिलेली नाही. यामुळे एपीएमसी सुरू ठेवायची की बंद करायची, नक्की कोणता विभाग बंद करायचा याविषयी बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.