- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) मार्च २०१७ दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नवी मुंबईचा निकाल ९३.७३ टक्के लागला असून १३,७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील १३९ शाळांपैकी ३२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर शहरातील सायबर कॅफे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारात ३४४५ मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. नवी मुंबईतील १४,६५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६५३ इतकी असून प्रथम श्रेणीमध्ये ४९५७, द्वितीय श्रेणीत ४०२५ आणि उत्तीर्ण श्रेणीत १३०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गुणपडताळणीसाठी आॅनलाइन सुविधाविद्यार्थी आणि पालकांचा त्रास कमी व्हावा याकरिता आॅनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा मुंबई बोर्डाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीकरिता मुंबई विभागाच्या वतीने आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहे. बुधवारपासून गुणपडताळणी आणि छायांकित प्रती स्वीकारल्या जाणार आहेत. गुणपडताळणीकरिता ५० रुपये तर छायांकित प्रतीकरिता प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये आकारले जाणार आहेत. अर्जानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती बोर्डाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिली. महापालिका शाळांचा निकाल ८७.२० टक्केमहानगरपालिकेच्या १७ माध्यमिक शाळांचा निकाल ८७.२० टक्के लागला असून नमुंमपा माध्यमिक शाळा ऐरोलीचा हरिकृष्ण तुकाराम बैनाळे हा विद्यार्थी ९३ टक्के संपादन करु न नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारा विद्यार्थी ठरला आहे. माध्यमिक शाळा, घणसोली येथील दरिया पकाराम चौधरी ही विद्यार्थिनी ९२.२०टक्के गुण संपादन करु न महापालिका शाळांमध्ये व्दितीय तर आरती हरिशंकर गुप्ता ही माध्यमिक शाळा, सेक्टर ५, कोपरखैरणे (हिंदी) ची विद्यार्थिनी ९१.२०टक्के गुण प्राप्त करु न तृतीय क्र मांकाची मानकरी ठरली आहे.ईटीसी केंद्राचा निकाल १०० टक्केमहानगरपालिकेचा ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्र म देशपरदेशात नावाजला जात असून या केंद्राचाही निकाल १००टक्के लागलेला आहे. केंद्रातील स्नेहल साळुंखे या कर्णबधिर विद्यार्थिनीने ७७ टक्के गुण संपादन केले असून साक्षी पवार या विद्यार्थिनीने ७३ टक्के, रु पाली चौगुले या विद्यार्थिनीने ६९ टक्के, शुभम पावडे या विद्यार्थ्याने ६७ टक्के, स्मिता उतेकर या विद्यार्थिनीने ६४ टक्के व आकाश शिंदे या विद्यार्थ्याने ६१ टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रवीण मोरे या अंध विद्यार्थ्याने ५७ टक्के गुण संपादन केले आहेत. - नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय सानपाडा या शाळेचा निकाल ९८.२४ टक्के, करावे शाळेचा ९७.९७ टक्के, दिवाळेतील शाळेचा ९३.३३ टक्के, नेरु ळचा ९२.९५ टक्के, सेक्टर ७ कोपरखैरणेचा ९२.८५ टक्के, दिघ्याचा ९२.३० टक्के, ऐरोलीचा ९२.०२ टक्के, शिरवणेचा ९०.३८ टक्के, घणसोलीचा ८८.७२ टक्के, तुर्भे स्टोअरचा ८७.७१ टक्के, सेक्टर ५ कौपरखैरणे येथील शाळेचा निकाल ८६.४४ टक्के, राबाडाचा ८४.७४ टक्के, तुर्भे गावाचा ८१.०८टक्के, महापेचा ७६.४७ टक्के, खैरणे (उर्दू) ७५.६० वाशीचा ७०.८८ टक्के,श्रमिक नगर ६४.७४ टक्के याप्रकारे निकाल लागला आहे.- बेलापुरमधील विद्याप्रसारक हायस्कुल च्या वांगणेकर रोहीत या विद्यार्थ्याने ९०.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. पन्हाळकर सूरज ८९.८० टक्के गुण मिळून दुस-या क्रमांकाचे स्थान मिळविले तर आडे चेतन या विद्यार्थ्याने ८७.६० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला. हे तिनही विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील कुटुंबातील असून शाळेच्यावतीने प्रोत्साहन दिले जाते. शाळेतील ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्त्तीण झाले आहेत. ४४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.- पुनर्परीक्षेचे वेळापत्रक लवकरचविद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता जुलै-आॅगस्टमध्ये पुन:परीक्षा घेण्यात येते. २०१७ फेब्रुवारी - मार्च दरम्यान झालेल्या परीक्षेत यशस्वी न झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी जुलै २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसता येणार आहे. ही परीक्षा १८ जुलैपासून घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक लवकरच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाणार आहे. याकरिता उत्तरपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक असून प्रत्येक विषयाकरिता ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.- कॉपी प्रकरणातील ३० विद्यार्थ्यांवर कारवाईपरीक्षेला बसलेले ३० विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळल्याने कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ६ विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून यापुढील पाच परीक्षांना हे विद्यार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मुंबई बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. कठोर कारवाई झालेल्या सहा विद्यार्थ्यांना २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येणार आहे, तर इतर विद्यार्थ्यांना पुढील एक परीक्षा देता येणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्येसौरभ चौगुलेला ८४.२०%महापे येथील हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अँड डेफब्लाइंड या संस्थेतील सौरभ श्रीधर चौगुले याने अंधत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेला ८४.२० टक्के गुण मिळविले. हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अँड डेफब्लाइंड ही संस्था १९७७ पासून कर्णबधिर आणि अन्य विकलांग मुलांसाठी काम करते. कर्णबधिरांंसाठी देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातल्या अत्यंत तुरळक संस्थांपैकी हेलन केलर इन्स्टिट्यूट आहे. संस्थेने यापूर्वी ४ कर्णबधिरांंना नॅशनल स्कूल आॅफ ओपन लर्निंगच्या माध्यमातून दहावीच्या परीक्षेला बसवले होते. अंध, मूकबधिर, कर्णबधिर असलेल्या सौरभने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत संस्थेच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक देवयानी हडकर, प्रज्ञा मसदेकर तसेच संस्थेतील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांमध्ये ९ विशेष भाग करण्यात आले असून यामध्ये अंध, कर्णबधिर, मूकबधिर, अस्थीव्यंग, बहुविकलांग, अध्ययनक्षम, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद यांचा समावेश आहे. मुंबई विभागातून दिव्यांग गटातील १७० अंध, २६२ मूकबधिर, ८८ कर्णबधिर, २८१ अस्थीव्यंग, ३९ बहुविकलांग, १३०१ अध्ययनक्षम, १७ स्वमग्न, ५६ सेरेब्रल पाल्सी आणि १२८ मतिमंद अशा एकूण २,३४२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. कॅन्सर, क्षयरोग तसेच इतर आजार असलेल्या १४ विद्यार्थ्यांचाही या गटात समावेश होता.