नवी मुंबईचा निकाल ९३.७४ टक्के, मुलींनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:35 AM2018-06-09T02:35:24+5:302018-06-09T02:35:24+5:30
दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ९२.४८ टक्के निकालासह पनवेल अव्वल स्थानी आहे. दोन्ही ठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील १४० शाळांमधून १४,४०३ विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते. यामधील १३,५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ९५.१४ टक्के मुली व ९२.५० टक्के मुलांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रामधून तब्बल ३,०२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. ४५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. याशिवाय तब्बल ६४ शाळांचा ९० ते ९९ टक्के निकाल लागला आहे. पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळविले आहे. ११४ शाळांमधून १०,४१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधील ९,६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून सर्वाधिक ९२.४८ टक्के निकाल पनवेलचा लागला आहे. यामध्येही ९४.४८ टक्के निकाल मुलींचा आहे. पनवेल व नवी मुंबईमध्ये बारावीनंतर दहावीमध्येही मुलींनी चांगले गुण मिळविले आहेत.
दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचेही लक्ष लागले होते. दुपारी १ वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर होताच सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शाळा, गृहनिर्माण सोसायटींमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अनेक विशेष मुलांनीही चांगले यश मिळविले.
ईटीसी केंद्राचे यश
महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा १०० टक्के निकाल लागला आहे. सलाह मुकादम या कर्णबधिर विद्यार्थ्याने ८० टक्के गुण मिळविले आहेत. प्रदीप चौधरी याने ७४ टक्के, सूर्या पणीकर याने ७९ टक्के गुण मिळविले आहेत. अध्ययन अक्षम दिव्यांग प्रवर्गातील केतन शर्मा या विद्यार्थ्याने ८५ टक्के गुण मिळविले आहेत. जिशान जेसानी याने ७४ टक्के गुण मिळविले असून विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी दिली आहे.
४४ विद्यार्थ्यांनी
परीक्षा दिली नाही
नवी मुंबईमधून १४,४२२ विद्यार्थ्यांनी व पनवेलमधून १०,४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. नवी मुंबईमधून १९ व पनवेलमधील २५ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिलेली नव्हती. नवी मुंबईमधील ९०१ व पनवेलमधील ७४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, असे आवाहन शिक्षकांसह तज्ज्ञांनी केले आहे.
सायबर कॅफेमध्ये गर्दी
पनवेलमध्ये निकाल पाहण्यासाठी १२ वाजल्यापासून अनेकांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. मोबाइलवर निकाल पाहताना वारंवार मोबाइल हॅक होत असल्यामुळे व नेटवर्कची समस्या असल्याने सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी निकालासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध केले होते.
महापालिका शाळांचा ८९ टक्के निकाल
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनीही दहावीच्या निकालामध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. नेरूळ शाळेतील वैष्णव कोंडाळकर याने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
करावेमधील रिश्वकुमार रवींद्र झा याने ९२.६०, कोपरखैरणे सेक्टर ७ मधील पूनम पांडुरंग शिंदे हिने ९०.८० टक्के गुण मिळविले आहेत.
महापालिकेने मनपा शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी सुट्यांच्या कालावधीमध्ये जादा तासिका घेण्यात आल्या होत्या.
याशिवाय महापालिकेने नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनाही सुरू केली असल्यामुळे त्याचा लाभ झाला आहे.
या सर्वांमुळे निकाल चांगला लागण्यास मदत झाली आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पालिका शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे
शाळा निकाल %
दिघा १००
दिवाळे १००
सानपाडा ९५.४५
वाशी ९५.३१
शिरवणे ९४.२४
घणसोली ९४.४
नेरूळ ९३.२२
कोपरखैरणे ९२.९८
करावे ९२.८५
ऐरोली ९०.१७
तुर्भे गाव ८९.३९
को.खै. सेक्टर ५ ८३.७७
राबाडा ८३.३३
खैरणे ८२.८९
महापे ८१.१३
तुर्भे स्टोअर्स ७५.९२
श्रमिक नगर ७२