प्राची सोनवणे ।नवी मुंबई : शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे. विलंबामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नवी मुंबईतील अभियांत्रिकी, विधि, पदवी, औषधनिर्माणशास्त्र आदी शाखांमधील विद्यार्थी आणि पालकांनी विद्यापीठाच्या निकाल पद्धतीबाबत असंतोष व्यक्त केला आहे.निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांना परदेशात तसेच इतर राज्यात असलेल्या शिक्षण संधींना मुकावे लागत असल्याने याची नुकसानभरपाई विद्यापीठाकडून मिळेल का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली असून विद्यापीठाचा हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.विधि शाखेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील ५ वेळा तारखा पुढे ढकलल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकर निकाल लागला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आॅनलाइन पेपर तपासणीमुळे झालेल्या निकालाच्या गोंधळाने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. तपासणी पद्धतीमधील त्रुटींचा परिणाम निकालावर झाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअररवर त्याचा वाईट परिणाम होईल. अशा वेळेस मोफत पुनर्मूल्यांकन केले जावे अशीही मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.औषधनिर्माणशास्त्राच्या शेवटच्या वर्षातील निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. नायपरसारख्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील अनेक अडचणी आल्या आहेत. ही आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली आहे.- डॉ. विलासराव कदम, प्राचार्य,भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी
निकालाचा तिढा अद्यापही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:24 AM