नवी मुंबई : शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायाम देखील व्हावा यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. पालिकेच्या या प्रणालीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. वाढलेल्या उन्हामुळे आणि सुट्यांमुळे या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद काही प्रमाणावर कमी झाला आहे. परंतु नागरिकांची मागणी पाहता जून महिन्यापासून शहरातील विविध भागात सायकल स्टँडची संख्या वाढविण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारख्या प्रदूषणमुक्त पर्यायाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. शहरातील नागरिकांनी देखील या योजनेला पसंती दिली आहे.
पहिल्या टप्प्यात नेरु ळ आणि सीवूड येथील विविध सात ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या सायकल स्टँडची संख्या सानपाडा वाशीपर्यंत गेली असून स्टँडची संख्या ४५च्या पुढे गेली आहे. या सायकलींचा वापर प्रामुख्याने व्यायाम करण्यासाठी केला जात असून सकाळच्या वेळी स्टँडवर असलेल्या सायकली अपुऱ्या पडत होत्या. दररोज या सायकलींचा वापर साधारण एक हजाराहून अधिक नागरिक करीत असून शहरातील विविध भागात सायकल स्टँड आणि सायकल उपलब्ध करून देण्याची मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सायकल स्टँडची संख्या ४५ पर्यंत नेण्यात आली असून सुमारे ४५0 हून अधिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाच्या झळा आणि सुट्यांमुळे सायकली वापरणाºया नागरिकांच्या संख्येत सुमारे १0 ते १२ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च महिन्यात सुमारे ५२ हजार राइड्स पूर्ण झाल्या होत्या.
एप्रिल महिन्यात या राइड्सची संख्या ४७ हजारांवर आली असून मे महिन्यात त्यापेक्षा देखील कमी राइड्स झाल्या आहेत. जनसायकल योजनेला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि मागणी यामुळे जून महिन्यापासून सायकल आणि स्टँडची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.