विमानतळाचे काम पुन्हा सुरू, सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 02:08 AM2020-04-29T02:08:58+5:302020-04-29T02:09:09+5:30
कमलाकर कांबळे नवी मुंबई : लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून बंद पडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली ...
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून बंद पडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. यासंदर्भात नवी मुंबई पोलिसांनी संबंधित कंत्राटदारांना सशर्त परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अलीकडेच उलवे टेकडीचे खोदकाम आणि खडक फोडण्याच्या कामाला सुरुवात केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सिडकोच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २0२२ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावरील कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. परंतु कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे विमानतळाच्या कामाला खो बसला आहे. असे असले तरी काही अटी व नियमांच्या अधारे बंद पडलेल्या विविध प्रकल्पांची कामे पुन्हा सुरू करण्याची अनुमती केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार सिडकोने विमानतळाच्या कामाला पुन्हा गती दिली आहे. उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. सध्या विमानतळ परिसरातील उलवे टेकडी आणि खडक फोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु लॉकडाउनमुळे ही कामे ठप्प पडली होती. ही कामे सुरू करण्यासाठी संबंधित दोन कंत्राटदारांना नवी मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली.
>कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. कामगारांच्या आरोग्याविषयी योग्य खबरदारी घ्यावी. त्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवॉश उपलब्ध करून द्यावे. तसेच या सर्व कामागारांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करावी, आदी अटी संबंधित कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
>कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या प्रकल्पांवर मजूर व कामगारांच्या निवासाची सोय आहे, त्या प्रकल्पांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत.
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको