कोट्यवधींचा मुद्देमाल परत
By admin | Published: July 25, 2015 03:48 AM2015-07-25T03:48:09+5:302015-07-25T03:48:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील काही गुन्ह्यांत शोध लावण्यात
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील काही गुन्ह्यांत शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी वाशी येथील साहित्य मंदिरात गुन्ह्यात जप्त मुद्देमाल परत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ७८ तक्रारदारांना ३ कोटी ५२ लाख ३८ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये झालेल्या गुन्ह्यांमधून हाती आलेला माल न्यायालयाच्या परवानगीने संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.
जप्त केलेल्या मालात ६५ लाख ७४ हजार ५४०रु. किमतीचे सोन्याचे दागिने, ३८ लाख ६० हजार किमतीचे चांदीचे दागिने, ६२ लाख ४५ हजार ५३० रुपयांची रोख रक्कम, ६ कार, १२ मोटारसायकल, ८० मोबाइल या वस्तूंचा समावेश होता. ७८ लाख ६५ हजार ८६ रुपयांचा सर्वात जास्त मुद्देमाल नेरुळ परिसरातून जप्त करण्यात आला. कळंबोली येथून चोरीला गेलेले संजय शहा यांचे ग्रेड स्टेनलेस स्टील कॉईल व प्लेट अशा एकण ४५ हजार ९५० किलो वजनाचे एकूण १ कोटी ११ लाख ४६ हजार २०० रुपयांचा माल परत करण्यात आला. वाशी येथील धीरज आहुजा यांचे ६७१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा २९ लाख ६० हजार किमतीचा ऐवज परत करण्यात आला. वाशी येथे राहणाऱ्या श्वेता राऊत यांच्या ३४ लाख रुपये किमतीच्या मर्सिडीज कारचाही यामध्ये समावेश होता तर, सीबीडी येथील व्हीक्टर पालुकारन यांना १३ लाख रुपयांची रोख रक्कम परत करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, गुन्हे शाखेचे सुरेश मेंगडे, विश्वास पांढरे, प्रशांत खैरे, शाखेचे सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, अरुण वालतुरे तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)