इंडियन एअरलाइन्सची जमीन घेणार परत, नेरूळमधील 20 एकरचा भूखंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:39 AM2017-11-23T02:39:14+5:302017-11-23T02:39:29+5:30
नवी मुंबई : इंडियन एअरलाइन्सला नेरूळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे २0 एकरचा भूखंड परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : इंडियन एअरलाइन्सला नेरूळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे २0 एकरचा भूखंड परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा भूखंड वापराविना पडून आहे. त्यामुळे तो परत घेऊन त्याची विक्री करण्याचे सिडकोने ठरविले आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या भूखंडाची किंमत पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.
सिडकोने विविध शासकीय संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन आरक्षित करून ठेवली आहे. परंतु या संस्थांनी वर्षानुवर्षे या भूखंडांचा ताबा न घेतल्याने शेकडो एकर जमीन वापराविना पडून आहे. या भूखंडांवर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे, तर काही भूखंडांवर खारफुटीची जंगले वाढली आहेत. वापराविना पडून असलेले शेकडो कोटी रुपयांचे हे भूखंड परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार इंडियन एअरलाइन्सला नेरूळ सेक्टर २७ मध्ये दिलेला सुमारे वीस एकरचा भूखंड परत घेण्याची प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड गेली अनेक वर्षे वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यावर जंगल वाढले आहे, तर भूखंडांच्या एका मोठ्या भागाचे तळ्यात रूपांतर झाले आहे. पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या कृत्रिम या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ व घनकचरा साचला आहे. या घाणीत कमळे फुलली आहेत. तसेच तळ्याच्या काठावर बांगलादेशीयांनी झोपड्या उभारल्या आहेत.
विशेष म्हणजे इंडियन एअरलाइन्सने हा भूखंड नको असल्याचे अलीकडेच सिडकोला कळविले आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपयांचा भूखंड भूमाफियांच्या घशात जाण्याअगोदर त्याचा रीतसर ताबा घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. भूखंडाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भराव टाकून हे तळे बुजविण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
>ओएनजीसीला दिलेल्या ४७ हेक्टर जागेवरही टाच
पनवेलमधील काळुंद्रे येथे ओएनजीसीला कर्मचारी निवासस्थान उभारण्यासाठी तीस वर्षांपूर्वी दिलेला ४७ हेक्टरचा भूखंडही परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मात्र कवडीमोलाच्या भावात मिळालेली सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची जमीन हातची जाऊ नये, यासाठी ओएनजीसीने आटापिटा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओएनजीसीने सिडकोच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी सिडकोने शुक्रवारी न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ओएनजीसीने जागेचा गैरवापर केला आहे. तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीचाही भंग करण्यात आला आहे. त्यामुळे सदर जागा परत घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सिडकोने या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
>नेरूळच्या भूखंडाची निविदा काढून करणार विक्री
नेरूळ सेक्टर २७ येथे एअर इंडिया कॉलनीच्या शेजारी इंडियन एअरलाइन्ससाठी आरक्षित ठेवलेला सुमारे ६.५ हेक्टरचा भूखंड परत घेऊन निविदा प्रक्रियेद्वारे त्याची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या भूखंडाची किंमत पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.