नवी मुंबई : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या विश्वचषक शुटिंगबॉल स्पर्धेत भारतीय शुटिंगबॉल संघाने कॅनडाच्या शुटिंगबॉल संघावर मात करीत शुटिंगबॉलचे पहिले विश्वविजेतेपद पटकाविले. या संघाचे प्रशिक्षक असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत सत्कार केला आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे नवी मुंबई शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावल्याबद्दल कौतुक केले.
शुटिंगबॉल हा भारतीय पारंपरिक खेळ असून भारतासह इतर अनेक देशांत खेळला जातो. या खेळासाठी आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, राज्यसभा सदस्य आणि महासचिव रविंद्र तोमर यांच्या अथक प्रयत्नाने यापूर्वी इंडो-नेपाळ, इंडो- बांगलादेश आणि एशियाकप अशा तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल फेडरेशनच्या वतीने "पहिली शूटिंगबॉल वर्ल्ड कप" स्पर्धा नवी दिल्ली जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे २ व ३ मार्च रोजी संपन्न झाली. या स्पर्धेकरिता भारतीय शूटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी गुरव यांची नियुक्ती झाली होती.
शुटिंगबॉल या मान्यताप्राप्त खेळातील नामांकित खेळाडू म्हणून शूटिंगबॉल खेळात मागील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीत त्यांनी अनेक वर्ष भारतीय शुटिंगबॉल संघात प्रतिनिधित्व केले असून भारतीय शूटिंगबॉल संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारतासह कॅनडा, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ या देशाचे संघ सहभागी झाले होते. भारतीय संघांचे सराव शिबिर झज्जर, हरियाणा येथे पार पडली यामध्ये प्रशिक्षक म्हणून अत्यंत उत्तम मार्गदर्शन करत संघाचे कसून तयारी करुन घेतली. शूटिंगबॉल खेळाच्या पहिल्या आणि ऐतिहासिक अशा वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी सामन्यात सर्वच संघांवर मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत नेपाळ संघाचा २१/०८ आणि २१/१२ अशा गुणांनी पराभव केला तसेच दुस-या उपांत्य फेरीत कॅनडाने बांगलादेशला २१/०८ आणि २१/१० अशा गुणांनी दोन सेटमध्ये नमवले आणि भारत व कॅनडा हे दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले. भारत आणि कॅनडा या संघांमध्ये अंतिम लढत झाली या सामन्यातील पहिला सेट २१/०८ असा चुरशीचा झाला. दुसरा दुसरा सेटही २१/१६ अशा गुणांनी जिंकत भारतीय संघाने पहिल्या शुटींगबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारतीय शुटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून गुरव यांच्या कुशल डावपेचांचे व मार्गदर्शनाचेही कौतुक झाले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी असल्याने या माध्यमातून महानगरपालिकेचाही नावलौकिक होत आहे. महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी याची दखल घेत गुरव यांचा सत्कार केला तसेच त्यांना आगामी यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ आणि सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, परिवहन विभागाचे मुख्य लेखा अधिकारी तुषार दौंडकर, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे उपस्थित होते.