फिफाच्या पूर्वतयारीचा आढावा , पालिका मुख्यालयात आयुक्तांची बैठक : सुशोभीकरणासह सर्व कामांसाठी सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:27 AM2017-09-09T03:27:28+5:302017-09-09T03:27:31+5:30
नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणा-या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणाºया १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस एमएसआरडीसी, सिडको, पोलीस व इतर आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. शहरात करण्यात येणारी सुशोभीकरणाची व इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.
फुटबॉल विश्वचषकासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी नवी मुंबईमध्ये येणार आहेत. डी. वाय. पाटील मैदानामध्ये ६, ९ व १२ आॅक्टोबरला प्रत्येकी दोन व १८ आॅक्टोबरला राऊंड आॅफ सिकस्टीन, २५ आॅक्टोबरला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. प्रत्येक सामना पाहण्यासाठी किमान ४० ते ४५ हजार क्रीडा रसिक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजकीय, उद्योग व इतर क्षेत्रामधील अनेक दिग्गज मान्यवरही मॅचेस पाहण्यासाठी येणार आहेत. या निमित्ताने नवी मुंबईचे नाव विश्वभर झळकणार असल्याने स्पर्धेसाठीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
नेरूळ सेक्टर १९ मधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या कामाची माहिती घेण्यात आली. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. वाशीमधील एनएमएसए मैदानामध्येही सराव सामने होणार असून तेथील तयारीचीही माहिती घेण्यात आली.
स्पर्धेच्या दिवशी वाहतूककोंडी होवू नये यासाठी वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात यावी. पार्किंग स्थळावरून स्टेडियमकडे ये - जा करण्यासाठी पुरेशा बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
सरावाच्या व स्पर्धेच्या वेळी पुरविण्यात येणाºया आरोग्य सेवेचा आढावा घेताना यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एनएमएसए वाशी मैदानाच्या ठिकाणी एमजीएम रुग्णालय वाशी व नेरूळमध्ये डी.वाय. पाटील रुग्णालयाच्यावतीने वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने व जवान तैनात केले जाणार आहेत. शहरात सुरू करण्यात येणाºया शटल बस सेवेच्या पार्किंगची व्यवस्था एनएमएमटी प्रशासनाने करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, मोहन डगावकर, संदीप संगवे, नितीन पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.