रेवदंडा किल्ला संवर्धनासाठी दुर्गप्रेमींची चळवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:05 AM2020-03-05T00:05:49+5:302020-03-05T00:06:01+5:30
तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियमित श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात असून, तटबंदीवरील झुडपे काढणे व साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. जंजिऱ्यानंतर सर्वाधिक तोफा रेवदंडावर आढळल्या आहेत. या तोफांची व तटबंदीसह इतर सर्व वास्तूंना संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
रायगड जिल्ह्यामधील दुर्गसंपत्तीचे जतन करण्यासाठी दुर्गप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. विविध किल्ल्यांवर वर्षभर सातत्याने श्रमदान मोहिमा राबविल्या जात असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जवळपास तीन वर्षांपासून रेवदंडा किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. जवळपास ४९५ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा परीघ पाच किलोमीटर पर्यंत आहे. सद्यस्थितीमध्ये तटबंदी अनेक ठिकाणी ढासळू लागली आहे. तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. दुर्गप्रेमी श्रमदान मोहिमा राबवून झुडपे काढून तटबंदीची स्वच्छता करत आहेत. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात तोफा आढळत आहेत. आतापर्यंत ५० तोफांची नोंद झाली आहे. या तोफांवर क्रमांकही टाकले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेली तोफ शोधण्यासाठीही दुर्गप्रेमींनी परिश्रम घेतले होते. राज्यातील सर्वाधिक तोफा जंजिºयावर असून, त्यानंतर रेवदंडा किल्ल्यावर आहेत. या परिसरामध्ये अजूनही काही तोफा जमिनीमध्ये काढल्या गेल्या असल्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या भुयारी मार्गाचीही साफसफाई केली जात आहे. सातखणी मनोरा व इतर काही अवशेष संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. साधारणत: २७ गुंठे परिसरच संरक्षित घोषित केला आहे. रेवदंडा किल्ल्याची तटबंदी, भुयारी मार्ग, तोफा व इतर वास्तूही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पत्रव्यवहार सुरू आहे.
>रेवदंडा किल्ल्यावर रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी संवर्धन मोहिमा आयोजित केल्या जात आहेत. जमिनीत गाढलेल्या तोफा बाहेर काढून त्यांना नंबर दिले आहेत. तटबंदीवरील झुडपे काढून साफसफाई केली जात आहे.
- सिद्धेश शेणवईकर,
अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान (अलिबाग विभाग)
>सहभागी सदस्य
रविवारी किल्ल्यावर आयोजित केलेल्या मोहिमेमध्ये सिद्धेश शेणवईकर, मेघा पाटील, अंकिता पाटील, निकिता पाटील, प्रशांत शेणवईकर, राकेश ठाकूर, सुजीत भोनकर, आदित्य कवळे, कैलास कासकर, महेंद्र गावडे, दीप भगत, श्रीकांत भगत, अभिर भोईर, निकेश सांदणकर, उमेश घरत, श्रवण घरत, मयूर पाटील, तेजस कवळे, अमोल तुरे, अल्पेश शेळके, विराज गुंड, सुयोग राऊत, गौरव पाटील, केदार पाटील, भूपेश पाटील, अक्षय पाटील, सौरभ खारकर, अश्विन विरकुट, साहिल चौलकर, सन्मेश नाईक, दिव्येश पाटील, अल्पेश थळे, करण नाईक, राकेश काठे, विशाल ठाकूर, वर्षा ठाकूर, विनिकेत भोईर, जिगर शिंदे, विनीत भोईर व इतरांचा सहभाग होता.
>रेवदंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. श्रमदान मोहिमेसह जनजागृतीही करण्यात येत आहे. तटबंदीसह इतर वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावी, यासाठी राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहोत.
- गणेश रघुवीर, अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्गसंवर्धन विभाग