आद्यक्रांतिकारकांच्या वाड्याची दुरवस्था; पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 02:22 AM2018-10-13T02:22:20+5:302018-10-13T02:22:48+5:30
पुरातत्त्व विभागाने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे नूतनीकरण केले; परंतु दोन वर्षांनंतरही त्याचे लोकार्पण केलेले नाही.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पुरातत्त्व विभागाने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे नूतनीकरण केले; परंतु दोन वर्षांनंतरही त्याचे लोकार्पण केलेले नाही. देखभाल करण्यासाठी यंत्रणाच निर्माण केलेली नसल्यामुळे स्मारकाची दुरवस्था होऊ लागली आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांची ओळख आहे. पनवेल तालुक्यातील शिरढोण हे आद्यक्रांतिकारकांचे जन्मगाव. गावातील वाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आला आहे. इतिहासप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी दोन कोटी रुपये खर्च करून वाड्याचे नूतनीकरण केले आहे. पुरातत्त्व विभागाने जुना वाडा आहे तसा उभा केला; परंतु त्याची देखभाल करण्यासाठी काहीही यंत्रणा उभी केलेली नाही. वाड्याचे लोकार्पणही केलेले नाही, यामुळे पुन्हा वाड्याची स्थिती बिकट होऊ लागली आहे. नियमित साफसफाई केली जात नाही. वाड्यातील जमीन सारवली जात नाही, साफसफाई केली जात नाही. आतमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. वाडा पाहण्यासाठी आलेल्या इतिहासप्रेमींना माहिती देण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी केलेली नाही. राष्ट्रीय स्मारक असून, एकही कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. वाड्याच्या परिसरामध्ये गवत वाढले आहे.
विहिरीची दुरवस्था झाली आहे. कौलांवर शेवाळ तयार झाल्याने त्याचा रंग उडाला आहे. लाकडाला लावलेला रंगही उडाला असून, अशीच स्थिती राहिली तर लाकडाला वाळवी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुरातत्त्व विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी स्मारकाकडे फिरकतही नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिरढोण ग्रामस्थांनी आद्यक्रांतिकारकांच्या आठवणी प्राणपणाने जपल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने वाड्याचे लोकार्पण करावे. देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे द्यावी. आम्ही स्मारकाची डागडुजी व देखभाल करण्यास समर्थ आहोत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
स्मारकाची देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. पुरातत्त्व विभाग देखभालीकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही ग्रामस्थ क्रांतिकारकांच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देखभाल करण्यासही आम्ही तयार आहोत; परंतु पुरातत्त्व विभागाने त्यासाठीचे अधिकार दिले पाहिजेत. जयंतीपूर्वी आम्ही ग्रामस्थ व इतिहासप्रेमी साफसफाई व आवश्यक ती दुरुस्तीची कामे करणार आहोत.
- मंदार माधव जोग, ग्रामस्थ व क्रांतिवीरप्रेमी
आद्यक्रांतिकारकांच्या आठवणी ग्रामस्थांनी जपल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने देखभालीसाठी यंत्रणा उभी करावी किंवा देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. यासाठी नियमित पाठपुरावा सुरू आहे. याविषयी शासनाने ठोस यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.
- प्रमोद कर्णेकर, उपसरपंच, शिरढोण
लोकार्पणाची पालकमंत्र्यांकडेही मागणी
शिरढोण गावामध्ये काही दिवसांपूर्वी कार्यक्रमासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. त्या वेळी ग्रामस्थांनी आद्य क्रांतिकारकांच्या स्मारकाचे नूतनीकरण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण झालेले नाही. देखभालीसाठी यंत्रणा उभारण्यात यावी, पूर्णवेळ कर्मचाºयाची नियुक्ती केली जावी, अशी मागणी केली आहे. चव्हाण यांनीही यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.