घंटागाड्यांवर जीपीएससह आरएफआयडीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:34 PM2020-12-27T23:34:57+5:302020-12-27T23:35:05+5:30
कचरा वाहतुकीसाठी ११९ वाहनांचा वापर सुरू आहे.
नवी मुंबई: घनकचरा व्यवस्थापनामध्ये नवी मुंबई पालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. कचरा वाहतुकीमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी जीपीएससह आरएफआयडीचा वापर होतो आहे. नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन सरासरी ७२० टन कचरा निर्मिती होते. वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे.
कचरा वाहतुकीसाठी ११९ वाहनांचा वापर सुरू आहे. ही वाहने नेमून दिलेल्या मार्गावरून व नेमून दिलेल्या वेळेत धावत आहेत का, याची माहिती घेण्यासाठी वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या कचरा कुंडीतील कचरा किती वाजता उचलण्यात आला, हे पाहण्यासाठी रेडीओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हायस (आरएफआयडी ) बसविण्यात आला आहे. या माध्यमातून कचरा वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे.
प्रत्येक वाहनावर ठेवले जाते लक्ष
घनकचरा विभागातील प्रत्येक वाहनावर जीपीएस व आरएफआयडी च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. नियंत्रण कक्षातून कोणती गाडी कुठे आहे व सर्व कचराकुंडीतील कचरा उचलला जात आहे का, यावर लक्ष ठेवले जात आहे.
नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ संबंधितांवर दंडही आकारण्यात येत आहे, याशिवाय नागरिकांनी काही तक्रारी केल्यास त्याचीही वेळेत दखल घेतली जात असून, संबंधितांना वाहनांची दुरूस्ती व इतर कामे करण्यास सांगितले जात आहे. ही वाहने नेमून दिलेल्या मार्गावरून व नेमून दिलेल्या वेळेत धावत आहेत का, या माहितीसाठी जीपीएस यंत्रणा आहे.