पेण : शेती व मशागतीच्या कामांना महाराष्ट्र दैनंदिन अंतर्भूत असलेली रोजगार अर्थात मजुरी मिळणार असून, प्रति दिवस १८१ रुपये मजुरीच्या दराने ग्रामीण परिसरातील शेतीची कामे करणाऱ्या महिलावर्गाला आपल्याच शेताच्या मशागतीच्या कामांचा मोबदला सरकारी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळणार आहे. शेतकरी बांधवांच्या शेतात कष्ट करणाऱ्या गृहलक्ष्मीसाठी ही गुड न्यूज असून याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक पेण प्रांताधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेऊन महसूल, कृषी, खारभूमी, वने व सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांना दिली. रोहयो कामात पेण नंबर वन बनत असून, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अग्रस्थानी राहून योजनेतून विधायक विकासकामे मार्गी लावत ३ कोटी ४२ लाखांच्या वर याद्वारे खर्च करून रोजगार व विकासकामांची सांगड घातली.सोमवारी सायंकाळी पेण प्रांत कार्यालयात याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक प्रांत निधी चौधारी यांनी बोलावून रोहयो योजनेतून विकासकामे, शेतीची कामे याबाबतचा निधी व कामांच्या मागणीबाबत रोहयोतील अंतर्भूत शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करून गाव, वाडी, वस्तीवर या योजनेतून ग्रामविकासाचा पाया मजबूत करण्याचे आवाहन केले. सध्या रोहयोची मजुरी प्रतिदिन १८१ रुपये असल्याने गावपातळीवर मागेल त्याला काम व रोजगाराचे प्रस्ताव तयार करून त्यांची तातडीने अंमलबजावणीचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पेणमध्ये २०११-१२ ला १ कोटी ५० लाख १० हजार ८१२ रोहयोंतर्गतचा निधी वापरला. २०१२-१३ ८३ लाख ७५ हजार ९७५ रु. निधी खर्च झाला. २०१३-१४ मध्ये ६६ लाख ८० हजार ६७० तर २०१४-१५ मध्ये ४१ लाख ५४ हजार ८४१ एकूण निधी खर्च होत असून, आगामी २०१५-१६ वर्षात सद्य:स्थितीत ४१ लाखांची रोहयोची कामे सुरू असून, येत्या काही दिवसांत जानेवारीअखेरपर्यंत हाच आकडा वाढत आहे. चार वर्षांत एकूण ३ कोटी ४२ लाख २२ हजार ३०८ रुपये निधी खर्च झाला आहे. शेतीच्या मशागतीची कामे, त्यांची रुपरेषा, शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ आदी कामे रोहयोतून केली जाणार असल्याने कृषी, महसूल, पंचायत समिती, या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामाचे अंदाजपत्रक व मजुरीचे प्रमाण याचा अराखडा बनविण्याचे निदेश पेण प्रांताधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. (वार्ताहर)
रोहयोत प्रतिदिनी १८१ रुपये मजुरी
By admin | Published: January 06, 2016 1:08 AM