कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 11:07 PM2019-07-06T23:07:14+5:302019-07-06T23:07:33+5:30
पुण्याचा कार चालक । पामबीच मार्गावरील वाशीतील घटना
नवी मुंबई : भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालकाच्या मृत्यूची घटना घडली आहे. यामध्ये इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुण्याच्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर अरेंजा चौकात हा अपघात झाला. दीपक सर्वेश्वर प्रसाद हा रिक्षाचालक एपीएमसीकडून कोपरीच्या दिशेने जात होता. यावेळी बाबू पाल हा प्रवासी रिक्षामध्ये बसलेला होता. त्यांची रिक्षा अरेंजा चौकात उजवीकडे कोपरीच्या दिशेने वळण घेत असतानाच नेरुळकडून भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचालक प्रसाद व प्रवासी पाल हे दोघेही गंभीर जखमी झाले असता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रसाद याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर बाबू पाल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन खोंद्रे यांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रहदारीच्या मार्गातून हटवली. या अपघात प्रकरणी कार चालक इशान बिपीन भट याच्याविरोधात वाशी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. तो पुण्याचा राहणारा असून त्याचे कोपरी येथे हॉटेल आहे. त्यानुसार पुण्यावरून कोपरीला येत असताना पामबीच मार्गावर हा अपघात झाला.