तळोजा : कळंबोलीमध्ये रिक्षाचालकांमध्ये थांब्यावरून वाद सुरू आहेत. रोडपाली परिसरामध्ये रिक्षाचालकास दुसऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली असून, याविषयी कळंबोली पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.सोमवारी रात्री या एम एच ४६ ए झेड ५७९४ रिक्षावरील चालक रोडपली डी-मार्ट जवळील पिझ्झा हट दुकानाच्या शेजारी प्रवासी घेऊन जात होता. रिक्षाचालक दत्ता शंकर धोत्रे याला विनाकारण रिक्षा अडवून प्रवासी का भरले, असे विचारत मारहाण केली व तेथून पळ काढला. त्यानंतर येथील डी-मार्ट जवळ असलेल्या रिक्षानाक्यावरून रिक्षाचालक आनंद गिड्डे यालादेखील एका अज्ञात रिक्षाचालकाने नाक्यावर रिक्षा पुन्हा उभी केली तर बेदम मारहाण केली जाईल, असा दम देऊन त्याला हाकलून लावले. या प्रकारानंतर कळंबोली रिक्षाचालक मालक संघटनेने या घटनेनंतर कळंबोली पोलीसठाण्यात धाव घेतली. अज्ञात रिक्षाचालकांविरुद्ध कळंबोली पोलीसठाण्यात अदाखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.सध्या परिवहन विभागाने रिक्षाचालकांना परवाने व परमिट बहाल केले आहेत. मात्र, शहरात राजरोसपणे बेकायदा असलेल्या रिक्षाथांब्याच्या रातोरात उभारणीमुळे रिक्षाचालकांची धुसफूस वाढत आहे. खारघर रेल्वेस्टेशन जवळ काही महिन्यांपूर्वी दोन रिक्षा संघटनेच्या हद्दीच्या वादातून मोठा हिंसक प्रकार घडला होता. मात्र, त्यानंतर आज पुन्हा अशाच प्रकारच्या घटना शहरात घडू लागलेल्या आहेत, त्यामुळे अशा प्रकरणाला आळा घालण्यासाठी मोठे आव्हान पोलीस व आरटीओ समोर उभे राहिले आहे.कळंबोली शहरात असलेल्या रिक्षाचालक-मालकांना कोणत्याही प्रकारे रिक्षानाक्यावर रिक्षा लावण्यापासून विरोध केला जात नाही. मात्र, तरीदेखील असा प्रकार जर घडत असेल, तर कायदेशीर पद्धतीत आवाज उठवला जाईल.- जयेंद्र पगडे, सल्लागार कळंबोली रिक्षा संघटनारिक्षाचालकांनी एकमेकांना सांभाळून घेऊन व्यवसाय करणे, असा सल्ला या आधीदेखील दिला आहे. रिक्षा नाक्यावरून किंवा हद्दीवरून वाद केला गेला, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- कोंडीराम पोपेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली
हद्दीच्या वादातून रोडपालीत रिक्षाचालकास केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:11 AM