नवी मुंबई - नेरुळमधील शिरवणेगावातील रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या रिक्षात एका प्रवाशाची बॅग विसरली होती. या बॅगेमध्ये ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही होते. पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला त्यांची बॅग सुखरूपरीत्या परत केली आहे. नेरुळ एलपी येथील रिक्षा स्टँडवरून गुरुवारी, ३ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सीवूड येथे जाणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तींनी पाटील यांच्या रिक्षाने प्रवास केला. प्रवाशासोबत साहित्य जास्त असल्याने त्यांनी रिक्षाच्या सीटच्या मागील बाजूसही साहित्य ठेवले होते. प्रवासी सीवूड येथे उतरल्यावर एक बॅग रिक्षाच्या सीटच्या मागील बाजूस विसरले. त्यानंतर, पाटीलही घरी परतले. दुसऱ्या दिवशी पाटील काही कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. बॅग विसरल्याचे प्रवाशाच्या लक्षात आल्यावर त्यांनी रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शोध लागला नाही.शुक्रवारी एलपी येथील रिक्षा स्टॅंडवर प्रवाशाने चौकशी केली, तसेच रिक्षाचालकाचे वर्णन इतर रिक्षाचालकांना सांगितले. त्यावर रिक्षाचालकांनी प्रवाशाला धीर देत, सदर रिक्षाचालक रूपेश पाटील असण्याची शक्यता वर्तविली. प्रवासी शनिवारी, ५ डिसेंबर रोजी पाटील यांच्या घरी पोहोचले. रिक्षाच्या सीटच्या पाठीमागे जागेत बॅग असल्याचे पाटील यांच्याही लक्षात आले नव्हते. प्रवासी घरी आल्यावर पाटील यांनी रिक्षामध्ये पाहिले असता, बॅग आढळून आली. पाटील यांनी सदर बॅग प्रवाशाला परत केली. बॅगेत असलेल्या सर्व वस्तूंची खात्री करून प्रवाशाने पाटील यांचे आभार मानले. शिरवणे गावात राहणारे रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
रिक्षाचालकाने केली प्रवाशाची बॅग परत, नेरुळमधील चालक; प्रवाशाने मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 1:22 AM