दिवसा रिक्षाचालक अन् रात्री करायचे घरफोडी; मोबाईलची दुकाने फोडणाऱ्या टोळीला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 13, 2024 07:01 PM2024-02-13T19:01:28+5:302024-02-13T19:01:43+5:30
मोबाईलची दुकाने फोडणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई: मोबाईलची दुकाने फोडणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रबाळे व खारघर येथील दोन गुन्हे उघड झाले आहेत. सर्वजण नेरुळचे राहणारे असून बेघर अथवा झोपडीत राहणारे आहेत. त्यापैकी एकजण दिवसा रिक्षा चालवायचा तर रात्री त्याच रिक्षाने साथीदारांसोबत घरफोडी करायचा.
रबाळे व खारघर येथे मोबाईलच्या दुकानात घरफोडीची घटना मागील आठवड्यात घडली होती. या गुन्ह्यांच्या अनुशंघाने गुन्हे शाखा कक्ष एकचे पथक अधिक तपास करत होते. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, निलेश बनकर, उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, विशाल सावरकर, सुमंत बांगर, बालाजी चव्हाण, दीपक पाटील आदींचे पथक केले होते. या पथकाने दोन्ही घटनास्थळाचा सीसीटीव्हीच्या तपासात संशयितांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या रिक्षाच्या आधारे पोलिसांनी दोनच दिवसात तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सतीश तपासे (२०), ओमकार बाबर (२०) व शफी शेख (२३) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे असून तिघेही शिरवणे, नेरुळ परिसरात राहणारे आहेत. त्यापैकी शफी शेख हा बेघर व व्यसनी असून त्याने परिचयाच्या एकाची रिक्षा वापरण्यासाठी घेतली होती. याच रिक्षाने रात्रीच्या वेळी साथीदारांसोबत मिळून मोबाईलच्या दुकानांमध्ये घरफोडी करायचे. त्यांनी रबाळे व खारघर येथील गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्या रिक्षात घरफोडीसाठी लागणारी हत्यारे आढळून आली आहेत. तर गुन्ह्यात लुटलेल्या मुद्देमालाची समान वाटणी केल्यानंतर प्रत्येकजण त्याच्या सोईनुसार त्याची विल्हेवाट लावत होता.
गुन्हे शाखा पोलिसांच्या या कारवाईवरून नेरुळ परिसरात झोपड्यांमद्ये, मोकळ्या जागेत आश्रयाला असलेली गुन्हेगार प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. गुन्ह्यांमध्ये त्यांना साथ देणाऱ्या मुंबईच्या इतर दोघांची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. तर अटक केलेल्या तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.