संघटनेच्या वादातून रिक्षाचालकांचा राडा, खारघरमध्ये रिक्षांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:40 AM2017-11-22T02:40:26+5:302017-11-22T02:40:37+5:30
खारघर शहरात रिक्षाचालकांमध्ये झालेल्या हद्दीच्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने मंगळवारी शहरात मोठा राडा झाला.
पनवेल : खारघर शहरात रिक्षाचालकांमध्ये झालेल्या हद्दीच्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने मंगळवारी शहरात मोठा राडा झाला. खारघर आणि तळोजा शहरातील रिक्षाचालक आपआपसांत भिडल्याने अनेक रिक्षांची तोडफोड झाली आहे. दोन्ही गटांतील रिक्षाचालक मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.
खारघर शहरात एकता रिक्षा संघटना ही एकमेव अधिकृत रिक्षा संघटना आहे. शहराचा विस्तार झाल्याने जवळच असलेल्या तळोजा किंवा खारघर शहरातील प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. दोन्ही शहरात स्वतंत्र अशा रिक्षा संघटना अस्तित्वात आहेत. या वाहतुकीदरम्यान खारघरमधील संघटनेचे रिक्षाचालक व तळोजामधील रिक्षाचालकांमध्ये सतत वाद होत असतो. मंगळवारी सकाळी ११ च्या दरम्यान दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांचा वाद खारघर रेल्वे स्थानकावर झाला. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अनेक रिक्षाचालक जखमी झाले. विशेष म्हणजे तळोजा येथील रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षात पूर्वतयारीनिशी दगड-धोंडे भरून आणले असल्याचा आरोप एकता रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अॅडव्होकेट सचिन कांबळे यांनी केला. तळोजा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाºयांनी देखील या वेळी खारघर रिक्षा संघटनेवर मनमानीचा आरोप केला. या वेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते. विशेष म्हणजे खारघर रेल्वे स्थानकाजवळील प्रवासी वाहतूक देखील काही काळासाठी बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झालेले या वेळी पाहावयास मिळाले. याठिकाणी मध्यस्थी करीत असलेल्या पोलिसांना देखील दगड लागला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमी झालेल्या रिक्षाचालक महेंद्र कोळी यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नेरूळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी, दोघांनी एकमेकांविरोधात तक्र ार दाखल केली आहे, दोघांनी आपआपसात हा वाद मिटवून व्यवसाय करावा. यासंदर्भात दोन्ही संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना यापूर्वीच दिल्या असल्याचे सांगितले.