कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मुजोरी; सातत्याने मोहीम राबवूनही बेशिस्तीला लगाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:27 AM2020-01-14T00:27:55+5:302020-01-14T00:28:55+5:30

आरटीओकडून ६९६ जणांवर कारवाई

Rickshaw puller Despite the constant campaigning, there is no restriction on the unscrupulous | कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मुजोरी; सातत्याने मोहीम राबवूनही बेशिस्तीला लगाम नाही

कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मुजोरी; सातत्याने मोहीम राबवूनही बेशिस्तीला लगाम नाही

Next

नवी मुंबई : रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. मागील नऊ महिन्यात आरटीओकडून ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक व सिग्नल तोडणे असे प्रकार रिक्षाचालकांमद्ये पहायला मिळत आहेत.

रिक्षांचे परमीट खुले केल्यापासून शहरातील रिक्षांमध्ये मागील दोन वर्षात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक व खासगी वाहनांपेक्षा रिक्षाच सर्वाधिक धावताना दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या तसेच आरटीओच्या नियमांचे उघडपने उल्लंघन होत आहे. मीटरप्रमाणे मागणी करणारे प्रवासी भाडे नाकारुन शेअर भाडे मिळवले जात आहेत. त्यामध्ये चार किंवा पाच प्रवासी रिक्षात कोंबले जात आहेत. शेअर भाड्याच्या एका फेरीत मीटरच्या भाड्यापेक्षा जास्त नफा असल्याने त्यांच्याकडून हा पर्याय निवडला जात आहे. याकरिता एनएमएमटीचे बस थांबे, महत्वाचे चौक तसेच ठिकाणी अवैध थांबे तयार करण्यात आले आहेत. त्याठिकाणी रस्त्यांवरच रिक्षा थांबवून प्रवासी भरले जात आहेत. याचा फटका महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला बसत असून, अशा ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा होत आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

परंतु अनेकदा कारवाई करुन देखील रिक्षाचालकांना शिस्त लागत नसल्याचेही पहायला मिळत आहे. वाढत्या तक्रारीमुळे आरटीओडून गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहतुक पोलिसांकडून देखिल सातत्याने कारवाईचा धडाका सुरूच असतो. यानंतरही रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियम अंगवळणी पडत नसल्याचे दिसून येत आहे. आरटीओ तसेच वाहतुक पोलिसांच्या कारवाईला न जुमता त्यांच्याकडून तिन पेक्षा जास्त प्रवासी रिक्षात भरले जात आहेत. तर अती वेगात रिक्षा पळवत असताना सिग्नलही तोडले जात आहेत. यामध्ये अपघाताचा धोका असून प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यामुळे सातत्याने नियमांची पायमल्ली करणारया रिक्षाचालकांचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. परंतु आरटीओकडून ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली आहे. काही संघटना देखील अशा रिक्षाचालकांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यापुढे आरटीओ अधिकारयांनीही हात टेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनावर तसेच प्रवाशांमध्ये संघटनेचा दबदबा वाढवण्यासाठी अशा प्रवृत्तींना थारा दिला जात आहे. त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून घेतला जात आहे. त्यांच्याकडून रात्री अपरात्री मद्यपान अथवा इतर नशा करुन रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलांमध्ये रिक्षातून प्रवास करताना असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांना आळा घालण्यासाठी त्यांचे परवाने कायमचे रद्द केले पाहिजेत. त्याकरिता वाहतूक पोलिसांऐवजी आरटीओकडून कारवाईवर जोर दिला जाणे आवश्यक आहे, परंतु मुजोर रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने अप्रत्यक्षरीत्या त्यांना पाठबळ मिळत असल्याचा संशय आहे. - रमजान मुजावर, रहिवाशी, कोपरखैरणे

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, तसेच इतर कारणांनी गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७९ बसेसवरदेखील कारवाई केली आहे. यापुढेही अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार आहेत, परंतु कारवाईसाठी एकच पथक असल्याने तीव्र स्वरूपाची मोहीम राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे. - दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

Web Title: Rickshaw puller Despite the constant campaigning, there is no restriction on the unscrupulous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.