रिक्षाचोरी करणारी टोळी अटकेत

By admin | Published: January 5, 2016 02:07 AM2016-01-05T02:07:34+5:302016-01-05T02:07:34+5:30

रिक्षांची चोरी करून त्यामध्ये बदल करून वापरणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

Rickshaw puller detained | रिक्षाचोरी करणारी टोळी अटकेत

रिक्षाचोरी करणारी टोळी अटकेत

Next

नवी मुंबई : रिक्षांची चोरी करून त्यामध्ये बदल करून वापरणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या २१ रिक्षा जप्त केल्या असून, त्यापैकी ७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. चोरलेल्या रिक्षांचे चेसीस नंबर मिटवून त्यावर बनावट चेसीस नंबर टाकण्यात ही टोळी सराईत आहे.
नवी मुंबई परिसरात रिक्षाचोरीचे प्रमाण वाढले असून, चोरीच्या रिक्षा इतरत्र वापरल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजण जगताप यांचे पथक अधिक तपास करीत होते. तपासादरम्यान चोरीच्या रिक्षा मुंब्रा परिसरात वापरल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानुसार साहाय्यक निरीक्षक प्रतापराव कदम, उपनिरीक्षक पडळकर यांच्या पथकाने मुंब्रा येथे सापळा रचला होता. त्यामध्ये अब्दुल खान ऊर्फ बटलाभाई (४०) व बाकर रिझवी (४८) हे दोघे त्यांच्या हाती लागले. चौकशीत त्यांच्याकडील रिक्षा चोरीची असून तिचा मूळ चेसीस नंबर मिटवून बनावट चेसीस नंबर कोरल्याचे आढळून आले. शिवाय मूळ रिक्षामध्ये थोडाफार बदल करून बनावट नंबरप्लेट लावून ही रिक्षा वापरली जात होती. याप्रकरणी त्यांना अटक केली असता, त्यांनी कासीम रिझवी (४०), मुकीन खान (२४) व फुरकान खान (२८) या तिघांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे या तिघांनाही मुंब्रा व लगतच्या परिसरात सापळा रचून अटक केली. यावेळी कासीम रिझवी या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. तो नवी मुंबईसह ठाणे परिसरातून रिक्षांची चोरी करीत असे. चोरलेल्या रिक्षा काही दिवस लपवून ठेवल्यानंतर तो रिक्षाचा मूळ चेसीस नंबर मिटवून त्याजागी बनावट नंबर कोरायचा. शिवाय रिक्षाच्या वूड व सीटमध्ये बदल करून बनावट नंबर प्लेटच्या आधारे त्या रिक्षा वापरासाठी बाहेर काढत असे. त्यापैकी काही रिक्षा भाड्याने वापरासाठी तर काही रिक्षांची तो विक्रीही करायचा. मात्र चोरीच्या रिक्षा वापरत असतानाही बनावट चेसीस नंबरमुळे त्या रिक्षा चोरीच्या असल्याचे अद्याप उघड झाले नव्हते. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे हा प्रकार उघड झाला. तसेच त्यांच्याकडून चोरीच्या २१ रिक्षा जप्त करण्यातही तपास पथकाला यश आले आहे. सुमारे २१ लाखांच्या या चोरीच्या रिक्षा आहेत. त्यापैकी सात गुन्ह्यांची उकल झाली असून, ५ नवी मुंबईतले तर दोन मीरा रोड व मानपाडा परिसरातील असल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी सांगितले. तर त्यांच्याकडून रिक्षाचोरीचे इतरही अनेक प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title: Rickshaw puller detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.