कारच्या धडकेने रिक्षाचालक ठार, म् रिक्षासह एटीएम सेंटरचेही नुकसान; कारचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:42 AM2017-09-15T06:42:45+5:302017-09-15T06:42:53+5:30
वाशी-कोपरखैरणे रोडवर गुरुवारी रात्री २ वाजता वेगाने जाणाºया कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक जनार्दन कमल यादवचे निधन झाले आहे. अपघातामध्ये रिक्षासह एटीएम सेंटरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिसांनी आरोपी चालकास अटक केली आहे.
नवी मुंबई : वाशी-कोपरखैरणे रोडवर गुरुवारी रात्री २ वाजता वेगाने जाणाºया कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक जनार्दन कमल यादवचे निधन झाले आहे. अपघातामध्ये रिक्षासह एटीएम सेंटरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिसांनी आरोपी चालकास अटक केली आहे.
जुहूगाव सेक्टर-११मध्ये राहात असलेला जनार्दन कमल यादव हा १५ वर्षांपासून रिक्षाचालक म्हणून काम करत आहे. मूळ उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून, पत्नी व तीन मुलांसह तो येथे वास्तव्य करत आहे. वृद्ध आई मूळ गावी राहते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे एमएच ४३ एसी ९५२९ ही रिक्षा घेऊन तो वाशी सेक्टर-१७मधील अभ्युदय चौकीजवळील स्टँडवर उभा राहिला होता. रात्री २ वाजण्याच्या सुमारास नेरुळमधील रहिवासी असलेला अमोल नंदा कुंभार हा ३३ वर्षांचा तरुण एमएच ४३ बीई ८१५३ वेगाने चालवत निघाला होता. त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. कार पदपथ ओलांडून समोरील एटीएम सेंटरमध्ये घुसली. महेंद्रा कोटक कंपनीचे एटीएम व येथील सिग्नलच्या पोलचेही नुकसान झाले आहे. भीषण अपघातामध्ये रिक्षाचालक जनार्दन यादव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कारचालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाला असून, त्याला सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी चालक अतिवेगाने कार चालवत होता. त्याने मद्यपान केल्याचे व येथील एका बारमधील कर्मचाºयांबरोबर त्याचे अपघातापूर्वी भांडण झाल्याचे सांगितले जात आहे; परंतु या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृत यादव हा मूळ उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. पत्नी व लहान मुले असा परिवार असून, घरातील एकटाच कमविणारा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. परिचितांनी दिवसभर रुग्णालयात जाऊन शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली.
या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याने मद्यपान केले असण्याची शक्यता असल्याने त्याची वैद्यकीय चाचणी करून गुन्ह्यामध्ये मद्यपानाच्या कलमांचाही उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मद्यपान केल्याचा संशय
वाशीमध्ये मध्यरात्री अमोल नंदा कुंभार याने वेगाने कार चालवून रिक्षाचालकाचा बळी घेतला. वास्तविक अंतर्गत रोडवर एवढ्या वेगाने कार चालविण्याची गरज नव्हती; परंतु चालकाने मद्यपान केले असल्याचे व येथीलच एका बारमध्ये त्याचे भांडणही झाले असल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी आरोपीची वैद्यकीय चाचणी घेऊन त्याने मद्यपान केल्याचे आढळल्यास तसा उल्लेख एफआयआरमध्ये करावा व त्याच्यावर फक्त अपघाताऐवजी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृताच्या परिचितांनी केली आहे.
गरीब चालकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा
कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाºया यादवच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याची आई गावी असून, पत्नी व तीन मुले जुहूगावमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला आहे. ज्या कारचालकामुळे हा प्रकार झाला, त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. पोलीस नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.