कोपरखैरणेत रिक्षाचालकांची गुंडगिरी, चालकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:15 PM2019-05-27T23:15:40+5:302019-05-27T23:15:43+5:30

एनएमएमटीच्या बस चालकावर रिक्षाचालकाने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

Rickshaw pullers raid in Koparkhairane, attack on driver | कोपरखैरणेत रिक्षाचालकांची गुंडगिरी, चालकावर हल्ला

कोपरखैरणेत रिक्षाचालकांची गुंडगिरी, चालकावर हल्ला

Next

नवी मुंबई : एनएमएमटीच्या बस चालकावर रिक्षाचालकाने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. डेपोतून बस बाहेर येत असताना रिक्षा आडवी आल्याने रिक्षाला अपघात झाल्याच्या वादातून ही घटना घडली. यावेळी इतरांनी मध्यस्थी केली असता, त्यांनाही शिवीगाळ करून रिक्षाचालकाने पळ काढला. कोपरखैरणे पोलीसठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरखैरणे येथील बस डेपोच्या प्रवेशाजवळ शनिवारी पहाटे प्रकार घडला आहे. एनएमएमटीची बस डेपोतून बाहेर येत असताना अचानक एक भरधाव रिक्षा आडवी आली. यामुळे रिक्षाला बसची धडक लागल्याने रिक्षाच्या आरशाचे नुकसान झाले. त्यामुळे रिक्षाचालकाने (एमएच ४३ बीएफ ६२२६) लाकडी दांडक्याने बस चालक जीवन कांबळे (४६) यांना बसमधून खाली खेचून मारहाण केली. यावेळी बसचे वाहक सागर दमामे व बस डेपोतील इतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, रिक्षाचालकाने त्यांनाही शिवीगाळ करत त्याठिकाणावरून पळ काढला. यामध्ये कांबळे यांच्या हाता-पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेप्रकरणी कोपरखैरणे पोलीसठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर २ परिसरात मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाने रिक्षा रस्त्यावरच उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. यावेळी रस्त्यावरून रिक्षा बाजूला हटवण्यास एका कार चालकाने सांगितले होते. याचा राग मनात धरून सदर रिक्षाचालकाने रिक्षात दगड घेऊन वाशीपर्यंत सदर कारचा पाठलाग केला होता.
>प्रवाशांना त्रास
घणसोली रेल्वेस्थानकाबाहेर अनधिकृत रिक्षाचालकांची गुंडगिरी पोलिसांच्याही नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक पोलिसांसह आरटीओने वेळीच नियंत्रण न मिळवल्यास शहरात रिक्षाचालकांमध्येच टोळीयुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशांना होत आहे.

Web Title: Rickshaw pullers raid in Koparkhairane, attack on driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.