पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक होत असून देखील वाहतूक पोलीस याबाबत कोणतीच कारवाई करीत नाहीत. रिक्षाचालक संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून देखील अवैध प्रवासी वाहतूक सुरूच राहिल्याने खारघरमधील संतप्त रिक्षाचालकांनी सोमवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र पोलीस उपायुक्तांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात खारघरसह कामोठे, कळंबोली येथील रिक्षाचालक सहभागी झाले होते. नवी मुंबईमधील सर्वपक्षीय रिक्षा चालक - मालक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने या आंदोलनाचा अनेक प्रवाशांना फटका बसला. खारघर, कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात सहा आसनी रिक्षा, ईको गाड्यांच्या मार्फत प्रवासी वाहतूक केली जाते. यामुळे तीन चाकी रिक्षा चालकांच्या धंद्यावर याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर या अवैध प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अशी रिक्षा चालकांची जुनी मागणी होती. या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून रिक्षा बेमुदत बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार कोकण भवन येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठक बोलावून संबंधित अवैध वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती रिक्षा चालक - मालक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कासम मुलाणी यांनी दिली. यासंदर्भात १२ एप्रिलला आढावा बैठक होणार आहे.
रिक्षाचालकांचा संप मागे
By admin | Published: March 22, 2016 2:38 AM