एपीएमसीजवळील पेट्रोल पंपासमाेर रिक्षाला आग; तुर्भे-वाशी रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:43 AM2020-11-29T00:43:58+5:302020-11-29T00:44:12+5:30
कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
नवी मुंबई : तुर्भे-वाशी रोडवर मलनि:सारण केंद्राच्या बाजूला पेट्रोल पंपासमोर रिक्षाला आग लागली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित आग विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटपासून जवळ मलनि:सारण केंद्राला लागून इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे.
शनिवारी सायंकाळी चार वाजता गॅस भरण्यासाठी रिक्षा पंपावर आली. गॅस भरून रिक्षा रोडवर आली असताना अचानक रिक्षाला आग लागली. रिक्षातून प्रचंड धूर येऊ लागला. पेट्रोल पंपासमाेरच ही घटना घडली असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून फायर एक्स्टींंग्वीशरच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. तसेच पंपावरील पाइपलाइनच्या साहाय्याने रिक्षावर पाण्याची फवारणी करण्यासही सुरुवात केली. काहींनी पंपावरील बादलीच्या साहाय्याने पाणी उपसण्यास सुरुवात केली. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये आग विझविण्यात यश आले.
पेट्रोल पंप व्यवस्थापनाने अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत आग आटोक्यात आली होती. अग्निशमन दलाने पाण्याच्या फवाऱ्याने आग पूर्णपणे विझविली. दरम्यान, पंपावरील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले.
बघ्यांना जवानांनी झापले
आग लागल्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाचे वाहनही फोन केल्यानंतर तत्काळ पोहोचले. परंतु तोपर्यंत आग शमली होती. बघ्यांच्या गर्दीमधील काहींनी अग्निशमन दलाच्या जवानांना उशिरा आल्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांना झापून फोन येताच तत्काळ आम्ही कर्तव्यावर निघत असतो. बघ्याची भूमिका घेऊन टीका करीत बसत नाही, अशा शब्दांत संबंधिताला झापले.