नवी मुंबई - नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. आगरी - कोळी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्यावतीने नेरूळमधील रामलीला मैदानामध्ये आयोजित आगरी-कोळी महोत्सवात केसरकर बोलत होते. या महोत्सवातून भूमिपुत्रांची संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम सुरू आहे. अशाप्रकारचे महोत्सव सर्व ठिकाणी झाले पाहिजेत. या महोत्सवातून संस्कृती रक्षणासह गृहउद्योगांना चालना मिळत असते. नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. नवी मुंबईच्या विकासामध्येही भूमिपुत्रांचे योगदान मोठे आहे. स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय टिकले पाहिजेत. आम्ही कोकणामध्ये फिशरी व्हिलेजची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.एका गावामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू असून तो यशस्वी झाल्यानंतर इतर ठिकाणीही तो राबविला जाईल.शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही आगरी-कोळी महोत्सवामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर पडली असल्याचे सांगितले. स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले.आगरी-कोळी महोत्सवात महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शन होत असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. आयोजक नामदेव भगत यांनी महोत्सवाचे आयोजन व १२ वर्षांच्या वाटचालीविषयी माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक शिवराम पाटील, द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, रंगनाथ औटी, शहर प्रमुख विजय माने, दिलीप घोडेकर, पूनम पाटील, अमित पाटील, मिथुन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.भूमिपुत्रांच्या त्यागावर नवी मुंबई उभी राहिली आहे. आगरी-कोळी समाजाचे सांस्कृतिक वैभव शहरवासीयांना समजावे यासाठी १२ वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये स्थानिक संस्कृतीबरोबर महाराष्ट्रातील लोककलांची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत.- नामदेव भगत, आयोजकसंस्कृती रक्षणाचा प्रयत्ननवी मुंबईमधील आगरी-कोळी नागरिकांनी त्यांची संस्कृती व लोककला प्राणपणाने जपल्या आहेत. गावातील प्रत्येक मंदिरामध्ये नियमित भजनाचे आयोजन केले जाते. लोकगीते, लोकनृत्याचेही आयोजन केले जात आहे. १२ दिवसांच्या महोत्सवामध्ये नवरी नटली, याल तर हसाल, दर्या हाय आमचा राजा, कीर्तन, महाराष्ट्र लावणी, मराठी लोकगीते, स्थानिक कलावंतांचे गुणदर्शन कार्यक्रम, नाचान रंगला कोळीवाडा व इतर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे - दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:49 AM