नवी मुंबई : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडीचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचे निमंत्रण मिळत असून वाहतूककोंडीतही भर पडताना दिसत आहे. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहतूककोंडीही होत आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्याने त्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम काही ठिकाणी हाती घेण्यात आले आहे; परंतु खड्डे बुजवण्याकरिता खड्ड्यांमध्ये खडी व वाळूचा भराव टाकला जात आहे.
असाच प्रकार वाशी कोपरखैरणे मार्गावरील कोपरखैरणेतील नाल्यावरील पुलावर पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून चालकांसह प्रवाशांच्या कंबरेच्या दुखण्यात वाढ झाली आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे खड्डे त्या ठिकाणी पाहायला मिळत असून, प्रत्येक वेळी ते बुजवल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा ते डोके वर काढत आहेत. या खड्ड्यांमुळे त्या ठिकाणी वाहतूककोंडीचीही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात अपयशी ठरत असलेल्या ठेकेदारांसह प्रशासनाप्रति प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. परिणामी, शनिवारी दुपारी हे खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. त्याकरिता खड्ड्यांमध्ये मोठी खडी व वाळूचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला असून, वाहतूककोंडीतही भर पडल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.वाहतूककोंडीची समस्याखड्ड्यात खडीचा भराव टाकल्याने त्या ठिकाणावरून जाणाऱ्या दुचाकींचे चाक घसरून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तर इतर वाहनांचीही त्या ठिकाणी गती मंदावत असल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत, त्यामुळे वाशी कोपरखैरणे मार्गावर वाशीकडे जाणाºया प्रवाशांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.