महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:29 AM2019-11-06T02:29:22+5:302019-11-06T02:29:30+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : सायन-पनवेल मार्गावरील प्रकार
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महामार्गाची देखभाल दुरु स्ती केली जाते. काँक्रीटीकरण केलेल्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने आदळत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महामार्गाची रुंदी वाढवून ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी काँक्रीटीकरणही करण्यात आले आहे; परंतु या महामार्गाची स्वच्छता, देखभाल आणि दुरु स्तीकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नेरु ळ, जुईनगर, सानपाडा, सीबीडी आदी ठिकाणी महामार्गावर काँक्रीटीकरणाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने आदळत असून दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या महामार्गाची स्वच्छता होत नसल्याने महामार्गाच्या कडेला कचरा, रेती, माती, मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. यामुळे आजवर लहान वाहनांचे अनेक अपघात झाले असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गाची स्वच्छता होत नसल्याने नवी मुंबई शहरातील अनेक नोडच्या महामार्गावरील प्रवेशद्वाराला बकाल रूप आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाची स्वछता, देखभाल आणि दुरु स्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होत आहेत. तर खड्ड्यामुळे वाहने उखडत असल्याने आरोग्याच्या व्याधीही बळावत आहेत.