मॅनहोलच्या झाकणामुळे अपघाताचा धोका, महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:58 PM2019-07-14T23:58:44+5:302019-07-15T00:00:11+5:30
नेरुळ सेक्टर २ मधील मॅनहोलच्या झाकणाची दुरवस्था झाली असून, गटारातील पाण्याच्या दाबामुळे झाकण तरंगत आहे.
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २ मधील मॅनहोलच्या झाकणाची दुरवस्था झाली असून, गटारातील पाण्याच्या दाबामुळे झाकण तरंगत आहे. यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
नेरु ळ सेक्टर-२ येथील शिरवणे विद्यालयासमोरील रस्त्यावरून मलनि:सारण केंद्रात जाणारी मलवाहिनी चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे. मलवाहिनीमध्ये पावसाच्या पाण्याच्या निचरा होत असल्याने पाण्याचा दाब आल्यावर मॅनहोलचे झाकण उचलले जाते. मॅनहोल शेजारीच शाळा आणि नागरी वसाहत असल्याने गटारावरील झाकणे सरकून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मलनि:सारण वाहिनीमधील सांडपाणी नागरी वाहसाहतीमध्ये शिरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाण्याच्या दाबामुळे गटारावरील झाकण सरकू नये, यासाठी झाकणावर वजन म्हणून त्यावर दुसरे झाकण ठेवण्यात आले असून यामुळे रस्त्यात अडचण निर्माण झाली आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.