ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचा धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 11:48 PM2021-01-03T23:48:03+5:302021-01-03T23:48:10+5:30

उलवेतील रहिवासी त्रस्त : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Risk of accidents due to overloaded vehicles | ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचा धोका 

ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचा धोका 

Next



लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : मालवाहतूक वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. अशातच उलवे परिसरातील रहिवासी भागातून ही वाहने भरधाव वेगात जात असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. परंतु, तक्रार करूनदेखील कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
उलवे परिसरातून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यात बांधकामाचे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र, ही वाहतूक करताना डम्परमधून क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जात आहे. शिवाय, नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली जाणारी खडी, माती, दगड बंदिस्त करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, परिसरात धूलिकण पसरून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. याचा नाहक त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उघडपणे नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या वाहतुकीला आळा घालण्याची मागणी उलवेतील सिडको प्रकल्पग्रस्त हक्कप्राप्ती समितीचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी वाहतूक पोलीस व आरटीओकडे केली होती. मात्र, तक्रार केल्यानंतर केवळ चौकशी करून प्रत्यक्षात कारवाईकडे दुर्लक्ष होतअसल्याचा आरोप केला आहे.

रस्त्यांची दयनीय अवस्था
क्षमतेपेक्षा जास्त माल भरून धावणाऱ्या डम्परमुळे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे सुविधांवरदेखील त्याचा परिणाम उमटत आहे. तर, ही मालवाहतूक कुठून कुठे होते, याचादेखील उलगडा अद्याप झालेला नसून आवश्यक कागदपत्रेदेखील वाहनचालकांकडे नसतात. त्यामुळे उल्वेवासीयांच्या जीविताला धोकादायक ठरणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Risk of accidents due to overloaded vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.