शहरात एटीएम सेंटरमध्ये कोरोना संसर्गाचा धोका; बँकांचे दुर्लक्ष, गरजेला पैसे काढणे बेतू शकते जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:36 AM2020-10-19T09:36:08+5:302020-10-19T09:37:00+5:30
शहरात विविध बँकांचे ४४३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी बँकांना लागून असलेल्या सुमारे ५० एटीएम सेंटरमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक उर्वरित ३९३ सेंटरमध्ये पैसे काढणे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहे. (ATM)
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई :बँकांच्या हलगर्जी शहरातील एटीएम सेंटर कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहेत. त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना राबवली जात नसल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु बँकांकडून पालिकेच्या प्रयत्नांवर पाणी पसरवले जात आहे.
शहरात विविध बँकांचे ४४३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी बँकांना लागून असलेल्या सुमारे ५० एटीएम सेंटरमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक उर्वरित ३९३ सेंटरमध्ये पैसे काढणे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहे. त्यात कन्टेनमेंट क्षेत्रातील एटीएम सेंटरचाही समावेश आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह नागरिकांची ये-जा असणाऱ्या इतरही महत्त्वाची ठिकाणे नियमित निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिकेकडून होत आहेत, तर मिशन बिगीन अगेन अंतर्गत व्यवसाय उद्योगांना अनुमती देतानाही खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहे. यानंतरही एटीएमच्या माध्यमातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बँकांकडून १०० रुपयांचे सॅनिटायझर पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
बहुतांश बाधितांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. अशा व्यक्तींकडून एटीएमचा वापर झाल्यास, दरवाजापासून ते मशीनच्या बटनापर्यंत अनेक ठिकाणी त्याचा स्पर्श होऊ शकतो. यामुळे त्या व्यक्तीनंतर त्या ठिकाणी येणाऱ्या अनेकांना मशीन हाताळताना कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
मशीनमुळे धोका -
सेंटरमध्ये नियमित रोकड भरण्याचे काम वेगतवेगळ्या एजन्सीमार्फत केले जाते. या कामगारांकडून मशीन हाताळताना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कामगारांकडून बँकांच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
साफसफाई रोज होते का?
बहुतांश एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांनी फाडून टाकलेल्या प्रिंटचा खच लागलेला पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी बीन्स देखील नसल्याने हा कचरा सर्वत्र पसरत आहे.
443 - शहरातील एकूण एटीएम
50 - एटीएमवर सॅनिटायझर
किंवा हॅण्डवॉश उपलब्ध
बँकांना पुन्हा सूचना देणार
कोरोनाला आळा घालण्यासाठी बँकांसह एटीएम सेंटरमध्ये नियमित सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. तशा प्रकारच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. यानंतरही एटीएम सेंटरमध्ये योग्य खबरदारी घेतली जात नसल्यास पुन्हा सर्व बँकांना सूचित केले जाईल.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका