नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार लसीकरण केंद्रांची वाढ करून रुग्णांचा आकडा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नव्हे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू करून लाखो रुपयांची वसुली केली जाते. मात्र, या कोरोना काळात रस्त्यावरील वाहतूक सिग्नल, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर तसेच बाजारपेठांचे प्रवेशद्वार येथील चौकाचौकांत भिकाऱ्यांचीही गर्दी दिसू लागली आहे.
अलीकडेच सरकारकडून टाळेबंदी उठविण्यात आल्यानंतर रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे वाहनांची गर्दी झाली व वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना सिग्नल सुरू करावे लागले. सिग्नलवर वाहने उभी राहताच भीक मागणारे भिकारी पुन्हा चौकाचौकांत उभे दिसत आहेत. आधुनिक शहरात भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या विद्रुपीकरणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
सिग्रलवर लाल दिवा लागताच ते वाहनांच्या गर्दीत घुसून भीक मागतात. काहीजण वाहनांच्या काचा पुसून नंतर पैसे मागतात. या धोकादायक पद्धतीमुळे वाहनधारकदेखील गांगरतो. हिरवा दिवा लागल्यानंतरही हे भिकारी रस्त्याच थांबत असल्याने वाहने पुढे काढण्याची कसरत करावी लागते. यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समाजातील भिक्षेकरी जर कमी करायचे असतील तर त्यांना परावलंबी करण्यापेक्षा; हाताला काहीतरी काम देऊन ‘स्वावलंबी’ बनवावे लागेल. बळाचा वापर न करता मायेने त्यांना योग्य रस्त्यावर आणायला हवे. पुण्यातून आम्ही याच कामाची ज्योत लावली आहे, याचीच पुढे मशाल व्हावी. - डॉ. अभिजित सोनवणे, डॉक्टर फोर बेगगर्स,पुणे.
‘कोरोनाकाळात हाताला काम नाही, अक्षरशः उपासमारीची वेळ आली असे अनेक लोक आहेत, उच्चभ्रू समाजातून कोरोना आला, पण कष्टकरी समाजाला अस्पृश्य वागणूक मिळू लागली, काही जणांना भीक मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. भिकारी समूहाचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत, अन्न वाटून प्रश्न सुटणार नाही, त्यांना काम दिले पाहिजे.” प्रा. वृषाली मगदूम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नवी मुंबई