गॅस सिलिंडरच्या वाहनांमुळे नेरूळला अपघाताचा धोका; नागरिकांमध्ये भीती
By योगेश पिंगळे | Published: March 13, 2024 04:00 PM2024-03-13T16:00:36+5:302024-03-13T16:00:55+5:30
कारवाईची मागणी, या परिसरात मागील काही दिवसांपासून औद्योगिक कंपन्यांना गॅस सिलिंडर पुरविणारी वाहने उभी राहत असून यामुळे परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावर जड-अवजड वाहनांची बेकायदेशीरपणे पार्किंग होत आहे. या वाहनांमध्ये ट्रॅव्हल्स बस, ट्रक, टेम्पो, कंटेनर, रुग्णवाहिका आदी वाहनांचा समावेश आहे. अशातच कंपन्यांना पुरविण्यात येणारे गॅस सिलिंडर पुरविणारी वाहने देखील शाळा आणि नागरी वसाहतीजवळील रस्त्यावरच उभी केली जात असल्याने परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बेकायदेशीरपणे पार्किंग होणाऱ्या जड-अवजड वाहनांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
नेरूळ सेक्टर २ मधील छत्रपती संभाजीराजे उद्यान आणि ४ मधील ईस्टर्न गॅलरीशेजारील रस्त्याने जुईनगर विभागात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रस्त्यालगत शाळा आणि नागरी वसाहत असून नागरिकांसह विद्यार्थ्यांचीदेखील मोठी वर्दळ असते. या रस्त्याच्या कडेला विविध परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची जड-अवजड बेकायदेशीरपणे वाहने उभी केली जातात. यामुळे रस्त्याशेजारील पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून लहान-मोठे अपघातदेखील होत आहेत.
या परिसरात मागील काही दिवसांपासून औद्योगिक कंपन्यांना गॅस सिलिंडर पुरविणारी वाहने उभी राहत असून यामुळे परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाली असून याकडे महापालिका, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरातील जड-अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.