खदाणी ठरताहेत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:28 AM2018-06-27T02:28:07+5:302018-06-27T02:28:11+5:30
खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत.
वैभव गायकर
पनवेल : खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत. पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली ही खदाणी (डबकी) पर्यटकांना भुरळ घालत आहेत. मागील तीन दिवसांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रविवारी खारघर येथील तळोजा कारागृहाच्या समोर असलेल्या डबक्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला, तर सोमवारी सेक्टर ३६ येथे एका बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे खारघर परिसरातील पावसाळी खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. खारघर हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पारसिक डोंगराच्या सान्निध्यात उभारलेल्या या शहराला विपुल निसर्गसौंदर्य लाभले आहे. पावसाळ्यात येथील पांडवकडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव पांडवकड्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगडमधून येणाऱ्या हौशी पर्यटकांचा हिरमोड होत आहे. धबधब्याची मौज घेण्यासाठी दुरून आलेल्या पर्यटकांना खारघरमध्ये पावसाच्या पाण्याने तयार झालेली डबकी आकर्षित करू लागली आहेत. याच आकर्षणातून चार निष्पाप जणांचे बळी गेले आहेत.
खारघरमध्ये सध्या मोठ्याप्रमणात विकासकामे सुरू आहेत. काही प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून सुरू आहेत, तर काही खासगी विकासकांचे आहेत. या विकास प्रकल्पाच्या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदले आहेत. परंतु पावसामुळे या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून संबंधित विकासकाने या ठिकाणी धोक्याचे फलक लावणे गरजेचे आहे. पाण्यात कोणी उतरू नये, यादृष्टीने डबक्याभोवती संरक्षण कुंपण लावण्याचीही गरज आहे. परंतु अनेक डबकी बेवारस असल्याने पर्यटकांना ते नैसर्गिक वाटू लागली आहेत. त्यामुळेच पांडवकडा नाही, तर या डबक्यात पोहण्याचा आनंद घेवू या भावनेतून पर्यटक त्यात उड्या मारत आहेत. हे प्रकार दरवर्षी घडत असल्याने त्यात अनेकांचे नाहक बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने कठोर उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
पावसाच्या पाण्यामुळे खारघर परिसरात ठिकठिकाणी पाणथळे निर्माण झाली आहेत. ही पाणथळे सुध्दा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
बिल्डरांवर अंकुश ठेवण्याची गरज
खारघर शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यांमुळे काही अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे. परंतु अनेक विकासकाकडून या नियमाला हरताळ फासला जात आहे. अशा बेजबाबदार विकासकांवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.