पनवेलमधील नदीकाठची गावे, नागरी वसाहत असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:59 AM2019-08-06T00:59:48+5:302019-08-06T00:59:57+5:30

पनवेल परिसरातून वाहणाऱ्या गाढी नदीमुळे लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला

Riverside villages in Panvel, urban settlement unsafe | पनवेलमधील नदीकाठची गावे, नागरी वसाहत असुरक्षितच

पनवेलमधील नदीकाठची गावे, नागरी वसाहत असुरक्षितच

googlenewsNext

- अरूणकुमार मेहत्रे 

कळंबोली : पनवेल परिसरातून वाहणाऱ्या गाढी नदीमुळे लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रविवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी लोकवसाहतीत शिरून अनेक घरांचे नुकसान झाले. या ठिकाणी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पनवेल तालुक्याच्या भौगोलिक अभ्यास करता, येथून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा या नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची समजली जाते. माथेरानच्या डोंगरांमधून उगम पावणाºया या नदीलगत नेरे, कोप्रोली, चिपळे, केवाळे, हरी ग्राम, आकुर्ली, सुकापूर, पाली-देवद, विचुंबे याबरोबरच, नवीन पनवेल आणि पनवेल शहरांचा समावेश आहे. माथेरानमध्ये पडणारा पाऊस थेट गाढी नदीत वाहून येतो, तसेच देहरंग धरणातील ओवरफ्लो झालेले पाणीही नदीच्या पात्रात येऊन मिळते. अतिवृष्टीमुळे अनेकदा नदी धोक्याची पातळी ओलांडते. मात्र, अशा वेळी पाटबंधारे विभागाकडून दक्षतेचा इशारा दिला जात नाही. त्याचबरोबर, नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात खडक आहेत. त्यामुळे पाण्याला अडथळा येऊन ते आजूबाजूला पसरते. नदीकिनारी अनेक अनधिकृत बांधकामेही झाली आहेत. त्याचाही पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या अनेक गोष्टी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

नदीपात्रातील पाणी बाहेर येऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. या सर्व गोष्टीमुळे रविवारी पनवेल शहर जलमय झाले, तसेच नदी लगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शिरवलीच्या डोंगरातून येणारी कासाडी नदी तळोजा, तसेच रोडपाली परिसरातून खाडीला जाऊन मिळते. या नदीलगतसुद्धा गावे आणि नागरी वसाहती आहेत. रविवारी पडघे गावात पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले, तसेच नऊ जण पाण्यात अडकले. स्थानिक युवक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितरीत्या त्यांना बाहेर काढले. ते वेळेवर पोहोचले नसते, तर अनर्थ घडला असता. याशिवाय रोडपाली येथील कातकरवाडी पाणी शिरल्याने आदिवासी कुटुंबांना कळंबोली येथील कालभैरव मंगल कार्यालय स्थलांतरित करावे लागले. इतर गावांमध्ये पावसाचा फटका बसला. पाताळगंगा नदीलगतचीही परिस्थिती वेगळी नव्हती.

संरक्षण भिंतीची गरज
गाडी आणि कासाडी नदीलगत ज्या गावांमध्ये, तसेच परिसरात पाणी शिरते, तिथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना पाटबंधारे विभागाने करायला हव्यात, तसेच येथे संरक्षण भिंत बांधून संबंधित गावे आणि वसाहती संरक्षित कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण म्हात्रे यांनी केली आहे. पूर आल्यानंतर जागे होण्यापेक्षा तो येऊ नये त्या अनुषंगाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यांनी सांगितले.

रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पनवेल तालुक्यातील नद्यांची पातळी वाढली. त्यानुसार, आजूबाजूच्या गावांना सूचना देण्यात आल्या होत्या. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभाग, महापालिका आणि सिडको या सर्व यंत्रणांना बरोबर घेऊन उपाययोजना केल्या जातील.
- अमित सानप,
तहसीलदार पनवेल.

Web Title: Riverside villages in Panvel, urban settlement unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस